आंबेडकरवादी गेल ऑम्व्हेट यांचे दुःख निधन / Sad Demise of Dr. Gail Omvet's आंबेडकरवादी गेल ऑम्व्हेट यांचे दुःख निधन / Sad Demise of Dr. Gail Omvet's - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Thursday, August 26, 2021

आंबेडकरवादी गेल ऑम्व्हेट यांचे दुःख निधन / Sad Demise of Dr. Gail Omvet's

<img src="gail-omvedt-passes-away.jpg" alt="reseracher author ambedkarites social activist gail amvedt passes away in India maharashtra at sangli"/>


आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या व धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणणाऱ्या जेष्ठ संशोधक -लेखिका, स्त्री मुक्ती चळवळ आणि परित्यक्ता स्त्रियांची चळवळ, आदिवासी चळवळी मध्ये पायाला भिंगरी लावून झपाटल्या सारखे काम करणाऱ्या विचारवंत कार्यकर्त्या गेल ऑम्व्हेट उर्फ शलाका पाटणकर  यांचे आज तारीख २५ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःख निधन झाले.

त्यांच्यावर गुरुवार ता. २६ रोजी सकाळी १० वा. कासेगाव जि. सांगली येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. गेल यांना लॉकडाऊन नंतर हळूहळू चालता येत नसल्यामुळे कासेगाव येथे घरीच डॉ. भारत पाटणकर यांच्या देखरेखेखाली वैद्यकीय उपचार घेत होत्या.

डॉ. गेल या मूळच्या जन्माने अमेरिकेच्या असल्या तरी त्या तेथे विध्यार्थीदशेपासूनच वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होत्या. अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधी उभा राहिलेल्या तरुणाईच्या चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या, वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या आणि महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाला आपलेसे केले, पुढे महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड (नॉन ब्राम्हीण मूहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया ) हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरकली विद्यापीठात सादर करून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली, त्यांच्या पूर्वी महात्मा फुले यांच्या चळवळीवर भारतातील कोणीही इतका सविस्तर अभ्यास करून, महाराष्ट्रभर फिरून मांडणी केली नव्हती. त्यांचा हा प्रबंध भारतातच नव्हे तर जगभरात अभ्यासकांना मैलाचा दगड ठरला आहे. त्यांच्या या पुस्तकामुळे फुलेंची चळवळ पुन्हा नव्याने अधोरेखित झाली. इतकेच नव्हे या पुस्तकामुळेच प्रभावित होऊन बहुजन समाज पार्टीचे संस्थापक दिवंगत कांशीराम कासेगाव येथे येऊन त्यांचे मार्गदर्शन व सल्ला घेत असत.

डॉ. गेल या अमेरिके सारख्या प्रगत राष्ट्राच्या मोहात न अडकता भारतात विशेषतः महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय घेतला. स्रि-मुक्ती चळवळींचा अभ्यास करत असतानाच क्रांतीविरांगना इंदूताई पाटणकर यांची भेट झाली. आणि एमडी चे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चळवळीत काम करण्याचा निर्णय घेतलेल्या डॉ. भारत पाटणकर या वादळाला आपला जीवनसाथी म्हणून निवडले आणि त्यांचा वादळी प्रवास सुरु झाला. प्रगत राष्ट्राचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले. डॉ गेल आणि डॉ भारत यांनी आपल्या निरामय आणि तितक्याच निर्भीड सहजीवनातून सावित्री जोतिबांचा वारसा पुढे नेत पुढच्या पिढीसाठी एक नवा आदर्श घालून दिला.

अफाट वाचनशक्ती, आणि पायाला भिंगरी बांधून फिरण्याची वृत्ती यामुळे डॉ. गेल या संपूर्ण भारतभर फिरत आणि लिहीत राहिल्या. वेगवेगळ्या चळवळीत पुढाकारात आणि सहभागात राहिल्या आणि चळवळींच्या बौद्धिक मार्गदर्शक बनून भारतभर मांडणी करू लागल्या. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात क्रांतिवीरांगना इंदूताई यांच्या पुढाकाराने परित्यक्ता स्त्रियांच्या चाललेल्या चळवळीच्या त्या प्रमुख राहिल्या. तत्कालीन खानापूर जि. सांगली तालुक्यामध्ये मुक्ती संघर्ष चळवळीच्या वतीने दुष्काळ निर्मूलन चळवळ, दुष्काळ निर्मूलनासाठी बळीराजा धरणाची निर्मिती यासाठी झालेल्या संघर्षात नेहमीच पुढाकारात राहिल्या. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली राज्यभर चाललेल्या विविध चळवळीच्या त्या वर्षभरा पूर्वीपर्यंत पुढाकारात आणि आधारस्तंभ म्हणून ठामपणे उभ्या राहिल्या आहेत.

डॉ. गेल यांनी देशभरातील विविध विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे विद्यापीठात फुले- आंबेडकर चेअरच्या प्रमुख, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक, ओरिसामधील निस्वास मध्ये आंबेडकर चेअरच्या प्रोफेसर, नोर्डीक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज कोपनहेगन, नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररी नवी दिल्ली, सिमला इन्स्टिट्यूट मध्ये प्रोफेसर म्हणून काम केले आहे. FAO, UNDP, NOVIB च्या सल्लागार राहिल्या आहेत. ICSSR च्या वतीने भक्ती या विषयावर संशोधन केले आहे. दि इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली या प्रतिष्ठित अंकामध्ये व द हिंदू या देशभरात जात असलेल्या इंग्रजी वर्तमान पत्रामध्ये यांचे विविध विषयावरचे लेख प्रकाशित झाले आहेत. द हिंदू यामधील लेख वाचून विरप्पन यांनी सुद्धा पत्र पाठवून कौतुक केले आहे.

डॉ. गेल यांची पंचिवीस पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित असून त्यामध्ये प्रामुख्याने कल्चरल रीवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हीण मुहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुमेन्ट इन इंडिया यांचा समावेश आहे.

डॉ. गेल यांनी देश आणि परदेशात अनेक संशोधन पेपर सादर केले असून शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार ही मिळाले आहेत. त्यांची मुलगी प्राची , जावई तेजस्वी, नात निया हे सध्या अमेरिकेमध्ये वास्थव्यास असून ते तेथे वेगवेगळ्या चळवळीत सहभागी असतात.

- चैतन्य दळवी | श्रमिक मुक्ती दल


No comments:

Post a Comment