कर्मवीर दादासाहेब भाऊराव गायकवाड यांचे कार्य व कर्तृत्व / Remembering Dadasaheb Gaikwad on his 50th Death anniversary कर्मवीर दादासाहेब भाऊराव गायकवाड यांचे कार्य व कर्तृत्व / Remembering Dadasaheb Gaikwad on his 50th Death anniversary - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Thursday, December 30, 2021

कर्मवीर दादासाहेब भाऊराव गायकवाड यांचे कार्य व कर्तृत्व / Remembering Dadasaheb Gaikwad on his 50th Death anniversary

<img src="dadasaheb-gaikwad-information-in-marathi-know-his-work-and-perfomance.jpg" alt="dadasaheb gaikwad a man right hand of dr babasaheb ambedkar in movements by babasaheb"/>




डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यांना स्वतःचा उजवा हात संबोधीत करीत. त्या बोधिसत्व कर्मवीर दादासाहेब भाऊराव गायकवाड यांचे कार्य व कर्तृत्व. आज 29 डिसेंबर त्यांच्या 50 व्या परिनिर्वाणदिनी दादासाहेबांना विनम्र अभिवादन!

आधुनिक बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतं, "माझ्या आत्मचरित्रात अर्धा भाग भाऊराव गायकवाड असणार आहे. तो नसला, तर माझे चरित्र पूर्ण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या म्हणण्यातच दादासाहेब गायकवाड यांचे आंबेडकरी चळवळीत, दलित चळवळीत व बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या राजकीय आंदोलनात महत्वाचे स्थान आहे. 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो दलितांना बौद्धधर्म दीक्षा दिली. त्यांनंतर 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांचे परिनिर्वाण झाले. त्यांनतर निर्माण झालेल्या पोकळीत दलित व बौद्ध चळवळीला एक नवीन दिशा देण्याचे महत्वाचे कार्य बोधिसत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केलेले आहे.



बौद्धांच्या धर्मदीक्षानंतर निर्माण झालेल्या नवीन समस्या ज्या शैक्षणिक व नोकरीत सवलत बंद होणे होते. बौद्धांना महाराष्ट्रात सवलत मिळवून देण्यात दादासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे धर्मांतरित बौद्ध हे दादासाहेबांचे सदैव ऋणी आहेत.

15 ऑक्टोबर1902 ते 29 डिसेंबर 1971 हा बोधिसत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा कालखंड होय. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या दलित चळवळीत अत्यंत प्रगल्भ, विश्वसनीय, जीवाला जीव देणारे व सामान्य माणसातील असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे होय. 

दादासाहेबांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या गावात झाला. किसन उपाख्य कृष्णराव हे त्यांचे वडील आणि पवळाबाई ही त्यांची आई होती. चार मुलीनंतर 15 ऑक्टोबर 1902 साली दादासाहेबांचा जन्म झाला. शालेय जीवनापासून त्यांना अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले. शाळेत बाहेर बसावे लागले. दादासाहेबांनी अबकारी खात्यात नोकरी मिळाली. त्यांची बदली मुंबईला झाली. त्यांनी राजीनामा दिला. दुसरी नोकरी नाशिक परिसरात पोस्ट अॅन्ड टेलिग्राफ खात्यात स्वीकारली. त्या खात्यातही त्यांची बढतीवर बगदाद येथे बदली झाली. पण, त्यांनी हे सारे नाकारले आणि नाशिकलाच राहिले. दादासाहेबांना अस्पृश्य समाजाप्रति तळमळ आणि आपुलकी होती, आपल्या अस्पृश्य समाजाचे प्रश्न व समस्या सोडाव्यात याकरीता बाबासाहेब आंबेडकरांना मदत करावी असे तरुण वयात त्यांना सतत वाटू लागलं.

श्री शाहू छत्रपती बोर्डिंग येथे दादासाहेबांनी सुपरिटेन्डेन्टची नोकरी स्वीकारली. या नोकरीत त्याचं मन रमू लागलं. सातत्यानी वाचन करू लागले. सोबत व्यायामही करायचे. त्यामुळे त्यांचे शरीर पिडदार झाले. व वाचनाने बुद्धीही तल्लख झाली. ग्रामीण भागातील अस्पृश्य बांधवांना ते मार्गदर्शन करायचे. 1926 ला वयाच्या 24 व्या वर्षात दादासाहेब सरकार नियुक्त सभासद' म्हणून नाशिकला नगरपालिकेवर त्यांची निवड झाली आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनाला कार्याला सुरवात झाली. यादृष्टीने हे वर्ष त्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरले. 

दादासाहेब आणि बाबासाहेब ही जोडी अस्पृश्य चळवळीतली अत्यंत महत्वाची जोड़ी मानल्या जायची. दादासाहेबांना बाबासाहेबांचा जो सहवास लाभला याबद्दल एक लेखक लिहितात की, "1926 हे वर्ष भाऊरावांच्या जीवनात अत्यंत अविस्मरणीय ठरले. ह्यावर्षी नाशिकला श्री शाहू छत्रपती बोर्डिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर उतरले होते. तेव्हाच प्रथमतः भाऊराव गायकवाड आणि बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा परिचय झाला. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि विद्भवतेने भाऊराव अत्यंत भारावून गेले. दादासाहेबांनी मनात प्रतिज्ञा केली की मृत्यू येईपर्यंत जन्मभर बाबासाहेबांच्या सेवेत व सहवासात राहायाचे त्यांनी ठरवले. तेथूनच पुढे सतत दादासाहेब बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात आल्याने त्यांचे अस्पृश्यांच्या समाजसेवेचे क्षेत्र अधिक विस्तृत झाले."

बाबासाहेबांच्या उच्च शिक्षणाबद्दल दादासाहेबांना अभिमान आणि आकर्षण वाटायचं. बाबासाहेबांशी त्यांच्याशी झालेली भेट ही त्यांच्या आयुष्याला त्यांच्यात आमूलाग्र बदल करणारी ठरली. बाबासाहेबांच्या सानिध्यात दादासाहेब नवीन विचारांनी न्हाऊन निघाले व त्यामुळे ते दलितांच्या सेवेसाठी झपाटलेल्या अवस्थेत कार्यरत झाले. बाबासाहेबांना दादासाहेबांच्या रूपाने एक मित्र, प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्ता मिळाला. हे दलित चळवळीच्या दृष्टीने ऐतिहासिक मूल्यमापन करणारे ठरले आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणा नंतर दादासाहेब हे दलित व आंबेडकरी चळवळीचे सेनानी ठरले. याविषयी कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.दादासाहेबांची इंग्रजी उत्तम होती.

दादासाहेबांचा विवाह ते 9 वर्षांचे असताना 7 वर्षाच्या रखमाजी बाबूराव दानी यांची मुलगी सीता यांच्याशी झाला. लम्राला सतरा वर्षे झाल्यानंतर त्यांना मुलबाळ न झाल्यामुळे त्यांच्या पत्नीनी हट्ट धरल्यामुळे दादासाहेबांचा दुसऱ्या लग्नाला विरोध असतानाही 20 मे 1928 ला सीताबाईच्या लहान बहिणीशी गीताबाई यांच्याशी त्यांचे लग्न झाले.

"अस्पृश्य चळवळीत महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह', "काळाराम मंदिराचा सत्याग्रह" आणि 'भूमिहीनांचा सत्याग्रह' दलित व भारतीयांच्या दृष्टीने मैलाचे दगड ठरलेले आहेत. यात बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दादासाहेब गायकवादांचे कार्य हे ऐतिहासिक आहे. ते विसरता येणे शक्य नाही. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या लढयाने दादासाहेब कर्तव्यनिष्ठ कार्यकर्ता असण्याचे सिद्ध झाले. चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून स्फूर्ती घेऊन नाशिक जिल्ह्यात त्यांनी मोठ्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला व चळवळी उभ्या केल्या. नाशिक लोकलबोर्डानी अस्पृश्यांकरिता विहिरी बांधल्या असताना अस्पृश्यांना पिण्याकरिता पाणी मिळत नव्हते. त्या विहिरीसाठी सत्याग्रह करून त्या विहिरी सर्वांसाठी खुल्या करवल्या. महाडचा सत्याग्रह हा त्यांच्या जीवनातला ऐतिहासिक सत्याग्रह आहे.

दादासाहेब लोकांमध्ये वावरायचे त्यांना लोकांचे मानसशास्त्र अवगत होते. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामुळे अस्पृश्य समाज एकवटू लागला. दलित आंदोलनाला गती प्राप्त झाली, दादासाहेब स्पष्ट वक्ते होते. ते नेहमी बाबासाहेबांपुढे आपली भूमिका स्पष्ट मांडायचे. चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून त्यांचा स्वाभिमान वृद्धिंगत झाला. त्यानंतर त्यांनी कुठेही झुकायचे नाही हा बाणा त्यांनी बिंबवला. याबाबत दिगंबर भालेराव यांचे मत लक्षात घेण्यासारखे आहे. ते म्हणतात की, "महाडच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने भाऊरावांबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खात्री झाली की, हा खरोखर कामाचा माणूस आहे. तेव्हापासून डॉ. आंबेडकरांच्या प्रत्येक चळवळीत भाऊरावांचा सक्रिय सहभाग असे." 1930 साली काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा केवळ भाऊरावांच्या विश्वासावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी करावयाचा ठरविला होता. बाबासाहेब आंबेडकरांचे दादासाहेब यांच्यावर प्रचंड विश्वास होता. या सत्याग्रह कमिटीचे सेक्रेटरी म्हणून सारी सूत्रे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हवाली केली होती. नाशिकचा 'काळाराम मंदिर सत्याग्रह' हा अस्पृस्य चळवळ व दलित मुक्ती संग्रामातील एक सोनेरी पान आहे. 'काळाराम मंदिराचा सत्याग्रह 5 वर्षे 7 महिने 11 दिवस पर्यंत चालला. यात दादासाहेबांना तुरुंगवास झाला. हिंदू सनातन्यांच्या विविध अन्याय, अत्याचारांना त्यांना तोंड द्यावे लागले. दादासाहेबांचा गौरव करताना 14 एप्रिल 1937 ला येवले येथे आंबेडरांनी दादासाहेबांच्या कार्याची प्रशंसा केली व पावती दिली. बाबासाहेब म्हणाले, "काळाराम मंदिर सत्यात्याच्या वेळी माझा भाऊराव गायकवाड यांच्यावरचा विश्वास हा कसोटीवर शंभर नंबरी सोन्यासारखा उतरला आहे. ते सोने अतिशय शुद्ध आहे. सर्व प्रकारच्या अग्नीतून ते तावूनसुलाखून से शुद्ध राहिले आहे. तेव्हा त्या आंदोलनाचा खरा नेता तोच भाऊराव हेच आहेत."



"मुखेडचा सत्याग्रह" दादासाहेबांच्या आयुष्यात महत्त्वाचा आहे. 23 सप्टेंबर 1931रोजी चातुर्मासाविरुद्ध 'पांडवप्रताप' ग्रंथाचे पारायण अस्पृश्यांतर्फे सुरू होते. त्याची समाप्ती करण्यात आली. अस्पृश्यांनी समाप्तीला ग्रंथ पालखीत ठेवून मिरवणूक काढण्यात आली. यात दादासाहेब आघाडीवर होते. दादासाहेबांचा सवर्ण हिंदूंनी प्रचंड विरोध करण्यात केला. दादासाहेबांनी त्याच ठिकाणी बैठक मांडली. त्यामुळे दादासाहेबांना हिंदू स्पृश्यांनी बेदम बदडून काढले. ते जखमी झाले व रक्तबंबाळ झाले व वेशुद्ध पडले. अस्पृश्यांची पालखी पांडवप्रताप सवर्ण हिंदूंनी घासलेट घालून जाळली. हे प्रकरण कोर्टात गेले. मुखेडच्या त्याबद्दल सवर्ण हिंदू लोकांनी दादासाहेबांना लेखी माफी मागितली. या प्रसंगाची इंग्रज सरकारने दखल घेतली. त्याविषयी फुलचंद खोब्रागडे लिहितात की, "या प्रसंगाचे वृत्त व छायाचित्र इंग्लंडचे प्रधानमंत्री रॅम्से मॅक्डोनॉल्ड यांना दादासाहेबांनी पाठविली. त्याचा परिणाम म्हणून अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आला. बाबासाहेबांनी दादासाहेबांना पत्र लिहून त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. 26 नोव्हेंबर 1931 रोजी एक पत्र 'जनता' साप्ताहिकातून प्रसिद्ध झाले. याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी म्हंटले आहे की, "भूखेड येथे आपले लोक व स्पृश्य हिंदू यांच्यात झालेल्या झगड्याच्या बाबतीत आलेल्या तारा मी वाचीत आहे. कोणत्याही परिस्थितीत लढा देण्याची आपल्या लोकांची तयारी पाहून मोठा आनंद होते."

22 जानेवारी 1937 रोजी विधानसभेत गावपंचयात बिलावर चर्चा करतांना कांग्रेस पक्षाने अस्पृश्यांचा उल्लेख "हरिजन" असा केला. दादासाहेबांनी त्यावर आक्षेप घेऊन म्हंटले, "अस्पृश्य जर देवाची लेकरे तर स्पृश्य हे शैतानाची लेकरे आहेत काय?" "हरिजन शब्द कांग्रेसने मागे न घेतल्याने बाबासाहेब आंबेडकरांसह सर्व पक्षातील सभासदांनी सभात्याग केला. 1946 मध्ये भारतात निवडणुका संपन्न झाल्या. त्यात दादासाहेब नाशिक येथून उभे होते त्यात ते पराभूत झाले. 1952 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा संपूर्ण महाराष्ट्रात दादासाहेबानी प्रचार केला. भूमिहीन मजुरांना पडीक जमिनी सरकारने द्यावी. याकरिता 1954 मध्ये मराठवाड्यात दादासाहेबांनी नेतृत्वाखाली सत्याग्रह केला. त्यात त्यांना चार महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा झाली. या सत्याग्रहात 10 हजार वर सत्याग्रहींना भाग घेतला. यात 2 हजारच्या वर कार्यकर्त्याना अटक झाली. यात 1600 कार्यकर्त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणा नंतर 7 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत देहास साक्षी मानून दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चैत्यभूमी मुंबई येथे हजर लाखों लोकांना बौद्धधर्म दीक्षा देण्यात आली. 1957 ला नाशिक लोकसभा मतदारसंघातुन कांग्रेसच्या देशपांडे यांना प्रचंड मताने पराभूत केले. 1958 ला दादासाहेबांनी महाराष्ट्रातील भूमिहीनांच्या सत्याग्रहात नेत्तुत्व केले. यात भाग घेणाऱ्या 35 हजार सत्याग्रहींना कारावास झाला.

1960 ला लोकसभेत प्रकाशवीर यांनी मागासलेल्या वर्गाना धार्मिक संरक्षण देण्यासंबंधीचे बिल आणले होते. 4 मार्च 1960 रोजी त्यावर खासदार दादासाहेबांनी आपली भूमिका मांडली, "अस्पृश्य व आदिवासी यांना तसेच मागासलेपणात ठेवून सामाजिक दृष्ट्या कनिष्ठ ठेवायचे असा बिलामागील हेतू दिसतो" असे बोलून दादासाहेब यांनी भर लोकसभेत 'मनुस्मृती'ची पाने फाडून त्यात असलेल्या 'माणुसकी विरोधी तत्त्वज्ञानाबाबत आपला तीव्र असंतोष प्रकट केला. तेव्हा लोकसभेतील वातावरण अत्यंत गंभीर झाले होते.

बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाविषयी दादासाहेबांना फारच प्रेम होते. रिपब्लिकन पक्ष गरीब, भूमिहीन, मजूर, शेतकरी, दलित, ओबीसी व सर्वांचा आहे असे ते म्हणत. दादासाहेब म्हणतात की, "अ. भा. रि. प., हा पददलित व पिळल्या गेलेल्या निर्धणांचा पक्ष आहे. ही गरीब जनता देशाचा अत्यंत दुर्बल असा भाग आहे. या पददलित जनतेच्या हक्कासाठी लढने आणि त्यांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय दर्जा वाढवून त्यांना इतरांबरोबर समानतेचा दर्जा मिळवून देणे हे कार्य करण्यास अ. भा. रि. प. प्रतिबद्द असून तसा या पक्षाने निश्चय केला आहे. " "अस्पृश्यांना गुलामगिरीतून मुक्त करा आणि स्वतंत्र वसाहतीची स्थापना करा, अशी खासदार दादासाहेब यांनी घोषणा देताच लोकसभेत अस्पृश्यांच्या प्रश्नावर वादळ निर्माण झाले. शेड्युल्ड कास्ट व शेड्युल्ड ट्राईन्स कमिशनर यांच्या रिपोर्टवर अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण सडेतोड भाषण खासदार दादासाहेब गायकवाड यांनी लोकसभेत केले. आणि दलितांच्या व बौद्धांच्या प्रश्नांची व सवलती संदर्भात व्यावहारिक व कायदेशीर बाजू सनदशीर मार्गाने मांडली.

'आम्हाला पडीक जमिनी द्या!' यासाठी वेळ आल्यास लढा द्यावा लागेल अशी खासदार दादासाहेब गायकवाड यांनी घोषणा केली. 1959 साली महाराष्ट्रात भूमिहीनांचे आंदोलन झाले. दोन महिन्यांच्या अवधीतच 35,000 पेक्षा अधिक सत्याग्रहींना सरकारने बंद करून तुरुंगात डांबले. भूमिहीनांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सत्याग्रह चालवा असे मुंबईच्या विराट सभेत खासदार दादासाहेब यांनी घोषणा केली. राज्यातील पडीक जमिनी लागवटीकरिता आदिवासी आणि मागासलेल्या जमातीच्या लोकांमध्ये वाटण्यास सरकारला भाग पाडण्यासाठी प्रत्यक्ष कृती आंदोलन सुरू करण्याचे निवेदन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष या नात्याने खा. दादासाहेब यांनी सरकारला दिले. "देशातील सर्व जमिनी सरकारने ताब्यात घेऊन त्या जमिनीचे राष्ट्रीयकरण केले पाहिजे. समाजवादी समाजरचना करण्यासाठी सरकारने सर्व जमिनी ताब्यात घेऊन सर्व गोरगरीब भूमिहीन मजूर शेतकऱ्यांना वाटली पाहिजे. भूमिहीन शेतकरी मजुरांना जमीन न दिल्यास रिपब्लिकन पक्ष लोकशाहीच्या मार्गाने शांततामय लढा उभारेल" अशी घोषणा शिवाजी पार्कवर मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भरलेल्या सभेत खासदार दादासाहेब यांनी केली. महाराष्ट्रात भूमिहीनांच्या सत्याग्रहाचा डोंब उसळला. भारत देशात करोडो एकर जमीन पडलेली असून जमीन भूमिहीनांना द्यावी, अशी विनंती अ. भा. रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आली. परंतु, या मागणीकडे लक्ष देण्यात आले नाही. याबाबत 1964 ला दिल्लीत रिप पक्षाचे वतीने निदर्शने करण्यात आली. यात एक लाखापेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला. दहा मागण्यांचे निवेदन तेव्हाचे प्रधानमंत्री लाल महादूर शास्त्री यांना देण्यात आले. 6 डिसेंबर 1964 ला देशव्यापी सत्याग्रहाची चळवळ शुरू करायची असा ठराव पारीत करण्यात आला. त्यानुसार रिपब्लिकन पक्षातर्फे सत्याग्रहाची चळवळ सुरू करण्यात आली. ही चळवळ दोन महिने सुरू होती. यात तीन लाख 40 हजार लोकांनी सहभाग घेतला आणि तुरुंगवास भोगला. या सत्याग्रहात सर्व जाती धर्माच्या भूमिहीनांनी भाग घेतला होता. तत्कालीन प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांनी रिपब्लिकन नेत्यांशी चर्चा करून मागण्या तत्त्वतः पूर्ण करण्यात आल्या या आंदोलनाचे दादासाहेब गायकवाड हे महत्त्वाचे लढवय्ये होते.

माणूस म्हणून जगावयाचे असेल, तर शिक्षणाची आवश्यकता सर्वांना आहे. सर्वांनी शिक्षण घ्यायला पाहिजे या विचारधारेथे दादासाहेब होते. शिक्षणाच्या सवलतीकरिता त्यांनी लढा दिला. "अस्पृश्य म्हणून शेड्युल्ड कास्टला मिळणाऱ्या आर्थिक, सामाजिक व इतर सवलती धर्मांतरित बौद्ध धर्मीयांना मिळाल्या पाहिजेत याकरिता सतत संघर्ष केला. दादासाहेब म्हणतात "बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून शेड्युल्ड कास्टचा माणूस एकाएकी सामर्थ्य संपन्न झाला आहे काय?" बौद्धांच्या सवलती बद्दल आम्ही सरकारला आमच्या मागणीबाबत विचार करण्यास पुरेशी संधी दिली आहे. आणि याबाबत जर आमच्या मागण्याचा फेरविचार केला गेला नाही, तर भूमिहीनांच्या लढ्याने सरकारला जसे 'सळो की पळो' करून टाकले तसेच लढ्याचे कंकण आम्हाला आमच्या हाती बांधावे लागेल. "असा सरकारला गंभीर इशारा खासदार दादासाहेब गायकवाड यांनी दादर चौपाटीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिला. नव महाराष्ट्राने बौद्धांच्या प्रश्नांची नोंद घ्यावी. याकडेही दादासाहेबांनी खासदार असताना आवाज उचलला. त्यांनी पद्दलित समाजाच्या प्रश्नावर युनोलाही निवेदनाच्या माध्यमातून आवाहन केले होते. बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न हा राष्ट्रीय प्रश्न म्हणून त्याची सोडवणूक करावी असेही आवाहन दादासाहेबांनी केले. बौद्धांच्या बाबतीत ते जागृत होते. बौद्ध धम्म प्रचाराची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेबांना दिली होती. दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात भारतभर व विशेषतः महाराष्ट्रात बौद्धधर्म दीक्षेचे असंख्य कार्यक्रम लावले गेलेत. तेही रिपब्लिकन पक्षाच्या सहकार्याने हे आंबेडकरी जनतेने नोंद घेणे आवश्यक आहे. बौद्ध धम्माला भारतात पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले.

बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर अनुभवी दादासाहेब गायकवाड यांनी "रिपब्लिकन पक्ष" बांधणी साठी जी प्रेसिडियम तयार झाली. त्याचे अध्यक्ष हे तरुण बॅरिस्टर खोब्रागडे यांच्यावर सोपवले. त्यानंतर रिपब्लिकन पक्ष अधिकृत रित्या स्थापना करण्यात आली त्याचे अध्यक्ष स्वतः न होता. एन. शिवराज यांना रिपब्लिकन पक्षाचे प्रथम अध्यक्ष केले. याप्रकारे प्रसंगी त्याग करून आदर्श प्रस्तावित करण्याचे कार्य दादासाहेबांनी केलेले आहे.

बाबासाहेब आणि दादासाहेब यांचे संबंध जिव्हाळ्याचे होते. व्यक्तिगत समस्यांच्या बाबतीतही बाबासाहेब दादासाहेबांचा सल्ला घेत. चळवळ अव्याहत सुरु ठेवण्याचा सल्ला बाबासाहेबांनी दादासाहेबांना दिला होता. दादासाहेबांवर बाबासाहेबांचा प्रगाढ विश्वास होता. आयुष्यभर चळवळीसाठी राबराव राबणारे दादासाहेब आयुष्याच्या संध्याकाळी थकायला लागले. त्यांना अर्धांगवायूचा 1969 साली झटका आला. त्यात ते विकलांग झाले. त्यानंतर त्यांचा अनेकांनी फायदा लाटला. त्यात त्यांच्यानंतर रिपचे नेते जे अध्यक्ष झाले व त्यांचे सहकारी जे दीक्षाभूमी स्मारक समितीचे आजन्म सभासद आहेत त्यांचा समाविष्ट आहे. या नेत्यांनी आपली पोळी भाजली. दादासाहेब काही करू शकले नाही. दादासाहेब गायकवाड हे तरुण बॅरिस्टर खोब्रागडे यांना स्वतःचा नेता म्हनुवन घेत. त्यांचा बॅरिस्टर वर प्रचंड विश्वास होता. एवढा मनाचा मोठेपणा दादासाहेब यांच्यात होता. त्यांच्या आजारीपणात व मानसिक दुर्बलतेत रिप पक्षाचे नेतृत्व हे बॅरिस्टर खोब्रागडे यांनी करावे अशी त्यांनी इच्चा होती. परंतु त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन त्यावेळी त्यांच्या जवळपास असणाऱ्या नेत्यांनी दादासाहेबांशी दगा करून बॅरिस्टर खोब्रागडे यांना पक्षातून बाहेर काढले.

या सर्व बाबींचा आघात घेऊन शेवटी 29 डिसेंबर 1971 ला दादासाहेबांचे परिनिर्वाण झाले. दादासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी डॉ. निर्मलकुमार फडकुले 'कर्मवीर दादासाहेब गायकवाड: काल आणि कर्तृत्व' या गौरवग्रंथात संपादकीयात लिहितात की, "सामाजिक समतेसाठी झालेल्या संघर्षातलं एक बलदंड व्यक्तिमत्त्व म्हणजे कर्मवीर दादासाहेब. शैक्षणिक क्षेत्रात त्याचं योगदान लक्षणीय आहे. राजकीय क्षेत्रातही त्यांची कर्तृत्वसंपन्न पावलं उमटलेली आहेत. दलित आणि शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दादासाहेबांनी अथक परिश्रम घेऊन चळवळी उभ्या केल्या. समतेच्या लढ्यात त्यांनी आपलं समग्र जीवन व्यतीत केलं. त्याचे संपूर्ण जीवन म्हणजे मानवतेचा उदात्त आविष्कार होता. डॉ. आंबेडकरासारख्या श्रेष्ठ क्रांतिकारकाच्या छायेत राहूनही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची आणि विचारांची पूर्ण वाढ केली. आंबेडकरी चळवळीला बळ देणारा एक निःस्पृह सेवाभावी, विचारशील आणि संघटनकुशल कार्यकर्ता म्हणून कोट्यावधी जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा स्थिर झाली आहे. "

कसेल त्याची जमीन, नसेल त्याचे काय?' हा भूमिहीनांचा प्रश्न पूर्णत्वास आणणारे दादासाहेब गायकवाड दलित समाजाशी एकरूप होऊन सर्वसामान्याचे जीवन ते जगले. त्यांचे राहणीमान अत्यंत साधं होतं. पायात वाहाना, अंगावर सदरा-धोतर व त्यावर कोट, डोक्यावर टोकदार निळी टोपी आणि हातातील पिशवीत काही कागदपत्रे असा त्यांचा पेहराव होता. दादासाहेब आंबेडकरी चळवळीतील एक कर्तृत्ववान चेहरा होते. दादासाहेब आंबेडकरी आंदोलनातील महत्त्वाचे महापुरुष आहेत.

आज 29 डिसेंबर दादासाहेब गायकवाड यांच्या 50 व्या परिनिर्वाणदिनी विनम्र दादासाहेब गायकवाड यांना नतमस्तक विनम्र अभिवादन.

दिनांक : 29 डिसेंबर 2021

उमेश गजभिये (समन्वयक - आंबेडकरी बौद्ध चळवळ)

*रिपब्लिकन बुद्धिवादी संघ*

जयभीम नमोबुद्धाय

साभार - उमेश गजभिये. मो. 9326887326.



No comments:

Post a Comment