"शिका, संघर्ष करा आणि संघटीत व्हा" बाबासाहेब नारा देतात. एवढा मोठा महापुरुष जेव्हा काही देण्याचा प्रयत्न
करतो तेव्हा त्यामागे प्रचंड अभ्यास असतो. जेव्हापासून बाबांच्या जीवनात बुद्धाने प्रवेश केला, तेव्हापासून हा
बोधिसत्व बुद्धाच्या मनाने विचार करत गेला, मग त्यातून प्रसवलेले विचार बुद्धापासून वेगळे असतील काय?
शिका:- शिका म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून पदव्या संपादन करणे नव्हे. तर शिकणे म्हणजे आत्मसात
करणे, जाणून घेणे. सिद्धार्थ आधी जाणून घेतो, ते शोषून घेतो
म्हणून त्याचा बुद्ध होतो. बाबासाहेब अभ्यास करतात, तो जाणून घेतात आणि योग्य वेळी त्याचा उपयोग करतात.
हीच तर 'प्रज्ञा' आहे. हे दोन्ही महामानव आधी स्वत: घडतात आणि मगच जगाला घडवण्यासाठी पुढे जातात.
'शिका' हा एक शब्द केवळ नाही. त्यात बाबासाहेब आपल्या 'Intelligent' न बनता 'Intellectual' बनायला
सांगतात.
संघर्ष करा:- संघर्ष करा म्हणजे चेतवा. स्वत:ला चेतवणे. कशासाठी? हाणामारीसाठी नाही तर हा संघर्ष स्वत:शी
आहे. स्वत:च्या मनाशी आहे. आपल्याच लोकांशी आहे. त्यांना आपले म्हणणे सांगण्यासाठी आणि त्यांनी ते ऐकून
आपल्यासोबत येण्यासाठीचा आहे. यासाठी संयम हवा, धैर्य हवे. धम्म हेच सांगतो. धम्म हेच शिकवतो. हा संघर्ष
जिंकला की तुम्ही अजातशत्रू असता. लोक तुमचं ऐकू लागतात. बुद्ध हा संघर्ष जिंकलेला असतो, बाबा हा संघर्ष
जिंकलेले असतात. म्हणून समाजातील बहुसंख्य लोक त्यांच्या सोबत असतात. हा संघर्ष जिंकल्याशिवाय संघटीत
होणं कठीण आहे.
संघटीत व्हा: वरील संघर्ष जिंकला की तुमच्यात कारुण्य निर्माण होतं. तुम्ही सर्व मनुष्यांकडे करूणेने पाहू
लागता. तुमचा त्यांच्याशी असलेला संघर्ष बऱ्याच अंशी संपलेला असल्याने ते तुमच्यासोबत आलेले असतात.
बुद्धाचा संघ असाच होता. बाबासाहेबांसाठी प्राण देण्यास तयार असलेली माणसं यातूनच आलेली असतात.
बाबासाहेब या त्रिसूत्रातून आपल्याला बुद्ध, धम्म आणि संघच पुन्हा देतात. प्रज्ञा, शील आणि करूणा ही तीन
शीलंच आपल्याला देतात. बाबासाहेब जरी क्रांतीचे पुत्र असले तरी ते तथागताचे अनुयायीच तर असतात. तेव्हा हे
त्रिसूत्र कधीही विसरू नका.