१ जून पासून महाराष्ट्रात शेतकऱयांचा बेमुदत संप सुरु झालाय .या संपाचं मूळ कारण शेतमालाला न मिळणारा
भाव व सध्या सत्तेत गुर्मीत तसेच माजलेल्या भाजपा सरकारची न मळालेली साथ आणि सरकारने जाहीर केलेली
कर्जमाफी जी अजूनही झालेली नाही किंवा त्यासाठी सरकारने कोणतेही पाऊले उचलली नाहीत . परंतु असा
संप काही वर्षांपूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वी करून दाखविला होता ,त्यावेळच्या सरकारला
शेतकऱयांकडे लक्ष द्यायला भाग पाडले होते .
आजच्या शेतकरी संपाच्या परिस्तिथीवर श्यामसुंदर सोन्नर यांची हि कविता तुमच्यासाठी शेतकरी
बांधवांसाठी , समाजासाठी अन सरकारला जाग करण्यासाठी ...
गावाकडचा संप,मंत्रालयाकडे वळवा
शेतकऱ्यांनो उठा आता मंत्रालयात घुसा
तिथे बसलेत ढोंगी त्यांच्या छाताडावर बसा,
गावाकडचा संप थेट मुंबईकडे वळवा
काळजात पेटला वनवा सरकारला कळवा
दगड असलेला हात मंत्रालयावर उठू द्या
सहाव्या मजल्याची काच एक तरी फुटू द्या
कळू द्या कसा असतो शेतकऱ्यांचा घुस्सा
तिथे बसले ढोंगी त्यांच्या छाताडावर बसा
डाॅक्टरच्या आंदोलनापुढे सरकार कसं वाकलं
सरकारी कर्मचाऱ्यापुढे कमरेमध्ये झुकलं
आता म्हणतात आम्हाला फरक पडत नाही काही
शेतकऱ्यांच्या संपाने आमचं बिघडत नाही
नाकाडावर ठेऊन द्या शेतकऱ्यांचा ठोसा
तिथे बसले ढोंगी त्यांच्या छाताडावर बसा,
शहरामध्ये डांबरी रस्ते तुमचं खड्यातुन वागणं
लोडशेडिंग तुमच्या नशिबी शहरात झगमगित जगणं
तुमची नदी आडवून आणलं शहरामध्ये पाणी
ओसाड तुमचं शेत झालं जगणं दीनवानी
शहरात सगळं घवघवीत तुमच्या गळ्यामध्ये फासा
तिथे बसले ढोंगी त्यांच्या छाताडावर बसा,
ऊन वारा पाऊस झेलून तुम्ही काढता पिक
व्यापारी म्हणतात देऊ तेवढ्या भावामध्ये विक
बियाणे, खत, किटकनाशकं रोज भाव वाढतात
शेतमालाचे भाव मात्र दरवर्षी पडतात
जगणं झालं जुगार कशाचा नाही भरंवसा
तिथे बसले ढोंगी त्यांच्या छाताडावर बसा,
मंत्रालयात न्याय मागावा तर मार खावा लागतो
शिकून झाला अधिकारी भाऊ शत्रुसारखा वागतो
ज्यांना दिलं निवडून त्यांना सत्तेचा माज
ढोंगीपणा पाहून त्यांचा वाटू लागते लाज
हक्क आपला मिळवायला तुम्हीच कंबर कसा
तिथे बसले ढोंगी त्यांच्या छाताडावर बसा
विधीमंडळच्या अधिवेशनावर कोट्यवधीचा खर्चा
पोकळ नुसत्या घेषणा फोल सगळ्या चर्चा
खोटे उमाळे खोटा आवेश खोटाच आव
राजकारणासाठी फक्त शेतकऱ्यांच नाव
असले लबाड तुम्हाला न्याय देतील कसा
तिथे बसले ढोंगी त्याच्या छाताडावर बसा
.
कवी : शामसुंदर महाराज सोन्नर
फोन - 9594999409: