तंगलान। बुद्ध पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न | thangalaan-attemt-to-revive-the-buddha तंगलान। बुद्ध पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न | thangalaan-attemt-to-revive-the-buddha - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Saturday, September 7, 2024

तंगलान। बुद्ध पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न | thangalaan-attemt-to-revive-the-buddha

 






फार पुर्वी या देशात नागवंशीयांचे राज्य होते.

        या नागवंशियांनी भगवान बुद्धांना अनेक मार्गांनी सहकार्य केले अगदी महाराष्ट्रातील लेण्यांत देखील जिथे बुद्ध कोरलेले आहेत तिथे नागवंशिय राजा राणी आपल्याला दिसतात.या भारताचा इतिहास नागवंशिय लोकांशिवाय पुर्णच होऊ शकत नाही.जुन्नर मधील नाणेघाट लेणीत नागवंशी सातवाहन सम्राज्ञी राणी नागणिकेने महाराष्ट्राचा इतिहास त्या लेणीत कोरून ठेवलेला आहे.

        बुद्धांच्या महापरिनिर्वाणा नंतर सम्राट अशोकांनी बुद्ध धम्माचा प्रसार हा जंबुद्विपात केला.सर्वदुर पसरलेल्या धम्माला नंतर नष्ट करण्यात आले.येथील नालंदा,तक्षशिलेसारखी विद्यापीठे जाळण्यात आली.

बुद्धांना अवतार म्हणुन घोषित केले.


जमिनीत गाडला गेलेला व विस्मृतीत गेलेला बुद्ध शोधण्यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्न सुरु केले.


        हा बुद्ध शोधण्यासाठी त्यांना एक प्रकारे सम्राट अशोकानेच मदत केली कारण अशोकांनी बुद्धांच जन्मस्थळ असलेलं लुंबिनी वन,ज्ञान प्राप्ती स्थळ बोधगया,प्रथम प्रवचन सारनाथ या प्रत्येक ठिकाणी वास्तू उभारल्या शिलालेख कोरून ठेवले.जंबुद्विपात ८४ हजार स्तुपांची निर्मिती केलेली आहे अशोकाने लिहिलेल्या शिलालेखांवरून ब्रिटिशांनी बुद्धांची विस्मृतीत गेलेली ही सर्व तीर्थस्थळे शोधून काढली...पुन्हा भारताला बुद्ध कोण आहेत याची ओळख करून दिली.. ही स्थळे शोधण्यासाठी अशोका सोबतच नागवंशीय राजाने कोरलेल्या लेण्यांची देखील तेवढीच मदत झाली..

        थंगलान या चित्रपटाची कथा देखील हीच आहे चीयान विक्रम हा पूर्वी नागवंशीय राजा होता बुद्धांना नष्ट करण्यासाठी आलेल्या परकीय तसेच स्वकीय आक्रमकांना त्यांनी थांबवून ठेवले होते कालांतराने युद्धात पराभूत झाल्याने येथील आक्रमकानी बुद्धांच्या मुर्त्या तोडल्या त्यांची मुंडकी तोडली व बुद्धांचे सर्व तत्त्वज्ञान जे सोन्यासारख आहे ते लुटून नेलं

        चित्रपटात ब्रिटिश हे देखील सोन्याच्या शोधासाठी तेथील एका खाणीमध्ये येथील अस्पृश्यांना घेऊन सोन्याच्या शोधाचे काम करत होते..चीयान विक्रम हा देखील त्यापैकीच एक त्याच्या मुलाचे नाव अशोक..खाणीत खोदकाम करत असताना त्याला बुद्धांचे शीर भेटते तसेच धड देखील भेटते जे पूर्वी येथील पुरोहिताच्या सांगण्यावरून राजाने तोडलेले होते.अशोकाने ते शिर व धड एकत्र करून बुद्धांची मूर्ती एका टेकडीवर उभी करून ठेवलेली आहे व तो त्या बुद्ध मूर्तीकडे एकटक पाहत असताना दाखविला आहे. संपूर्ण चित्रपटात ती मूर्ती वेगवेगळ्या प्रकारे दर्शविण्यात आलेली आहे.काही संकटांना सामोरे गेल्यानंतर सोन्याचा शोध लागतो खरा परंतु त्या मिळालेल्या सोन्यात तेथील कामगारांना वाटा देण्यात ब्रिटिश अधिकारी नकार देतो. त्यानंतर चीयान विक्रम याला जाणीव होते की आपण गुलाम नसून पूर्वीचे या भूमीतले नागवंशीय राजे होतो युद्धात पराभूत झाल्यामुळे आपल्यावर निर्बंध आले गावकुसाबाहेर राहण्याची वेळ आली यात 'शूद्र पूर्वी कोण होते" या डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकाची आठवण होते.

        जमीनदार लोक कशाप्रकारे येथील जनतेला फसवून त्यांची जमीन बळकवतात व त्यांना त्यांच्या स्वतःच्या जमिनीत मजूर म्हणून राबवतात हे चियान विक्रमला पाहवले नाही म्हणूनच तो ब्रिटिशांसोबत सोन्याच्या खाणीमध्ये कामासाठी गेलेला असतो.तिकडे जाण्यासाठी सुद्धा त्याला खूप कष्ट करावे लागलेले आहेत.एकतर त्या त्या परिसरात भूत राहत असल्याची अंधश्रद्धा त्यांच्या समाजात रूढ झालेली होती.या अशा परिस्थितीत देखील तो त्याचा मुलगा अशोक याला घेऊन त्या परिसरात गेलेला असतो.तेथे त्यांनी जाऊ नये यासाठी त्याला लोक खुप विरोध करत असतात त्यावेळी त्याच एक वाक्य आहे की हजारो दिवस गुलाम म्हणुन राहण्यापेक्षा एक दिवस स्वाभिमानाने राहु.

        तिकडे खाणीत त्याला एक नागवंशिय राणी नागनिका ते सोन काढण्यासाठी विरोध करत असते.ती का विरोध करतेय हे त्याला समजत नसत परंतु एक दिवस असा येतो की त्याला त्याचा पुर्वीचा इतिहास माहित होतो व तो व ती नागराणी दोघे मिळुन ते युद्ध जिंकतात व खरे सोनं त्यांना प्राप्त होत.

        हि कथा लिहीत असताना रंजित यांनी आपली प्रतीक खुप सुंदर रित्या दर्शविली आहेत.यात सोन कुठे आहे हे एक मोर दाखवत असतो तसेच नाग लोक त्या सोन्याच रक्षण करत असतात.

या मातीत गाडलेला बुद्ध हेच खरं सोनं आहे व त्याला संरक्षित करणारे इथले नागराजे आहेत.


        गाडलेला बुद्ध मी स्वतः पाहिलेला आहे.त्याला जोडण्याच काम देखील मी स्वतः केलं असल्यामुळे हा इतिहास नक्की काय आहे हे मला तरी खुप चांगल्या प्रकारे माहित आहे.त्यावर नंतर कधीतरी मी लिहिणारच आहे.

        वरती मी जे काय लिहलं आहे ते समजण्यासाठी जस अवघड आहे तसेच हा चित्रपट देखील थोडा किचकट आहे.ज्या भारतीयाला इथला हजारो वर्षांचा इतिहास माहित नाही त्याला हा चित्रपट समजणार नाही त्यासाठी त्याने इथल्या इतिहासाची पाने पहिल्यांदा चाळनं गरजेचे आहे.

साभार - सिद्धार्थ कसबे ..


No comments:

Post a Comment