दादर रेल्वे स्टेशन नामकरण विरोध,जातीय मानसिकता की जातीय राजकारण ? दादर रेल्वे स्टेशन नामकरण विरोध,जातीय मानसिकता की जातीय राजकारण ? - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Sunday, November 17, 2019

दादर रेल्वे स्टेशन नामकरण विरोध,जातीय मानसिकता की जातीय राजकारण ?

दादर रेल्वे स्टेशन नामकरण विरोध,जातीय मानसिकता की जातीय राजकारण ?

आधुनिक अखंड भारताचे निर्माते, युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव दादर रेल्वे स्टेशनला देण्यासाठी भीम आर्मीच्यावतीने पुन्हा मागणी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी भीम आर्मीने दादर रेल्वे स्टेशनचे चैत्यभूमी - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे तीन वेळा प्रतिकात्मक नामकरण केले होते. तसेच, रेल्वे मंत्र्यांच्या नांवे जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहेत.

<img src="dadar-to-chaityabhumi.jpg" alt="bhim army demands rename dadar to chaityabhumi"/>


डॉ. बाबासाहेब आंबेडकर अथवा चैत्यभूमी हे नांव दादर रेल्वे स्टेशनला द्यावे ही आंबेडकरी जनतेची गेल्या अनेक वर्षाची मागणी आहे. कारण आंबेडकरी चळवळीचे केंद्र आंबेडकर भवन, बुध्दभूषण प्रिटिंग प्रेस, राजगृह, चैत्यभूमी अशा अनेक बाबासाहेबांच्या निगडीत स्मृती जगाला आठवण करुन देतात. महापरिनिर्वाण दिनी तर प्रतीवर्षी लाखो, करोडो आंबेडकरी, आंबेडकरवादी अनुयायी आपल्या लाडक्या नेत्याचे, दैदिप्यमान देशभक्ताचे, स्फुर्तीस्थानाचे, उध्दारकर्त्याचे, मुक्तीदात्याचे भावपूर्ण दर्शन घेण्यासाठी, त्यांच्या पवित्र स्मृती जागविण्यासाठी, आदरांजली, मानवंदना देण्यासाठी, विनम्र अभिवादन करण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी मोठ्या शिस्तीने, संयमाने प्रतीवर्षी चैत्यभूमीवर येत असतात. प्रतीवर्षी त्यांच्यात प्रचंड वाढ होत आहे आणि होतचं राहणार. कारण स्वयंस्फुर्तीन् चैत्यभूमीवर येत असलेल्या अथांग जनसमुदयाची भव्यता अरबी समुद्रालाही लाजवेल अशीचं असते.

तसे पाहिले तर, भारताच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा बाबासाहेबांच्याचं नांवे आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. एवढे बाबासाहेबांचे देशावर परोपकार आहेत. देशाच्या प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांचे योगदान असून, भारत देशासाठी दूरदृष्टी ठेवून अनेक अनमोल विकासात्मक भविष्यकालीन निःपक्षपाती धोरणे राबविली आहेत. मी प्रथम भारतीय अन् अंततःही भारतीय अशी प्रखर व्यापक राष्ट्रवादाची संकल्पना मांडणाऱ्या जागतिक विध्वता, जागतिक किर्तीच्या दिग्विजयी महान नेत्याच्या नावाचा दादर रेल्वे स्टेशन नामांतराला विरोध होत असेल तर, यातून देशाची दळभद्री जातीय मानसिकता दिसून येते की सोयीचे जातीय राजकारण ?

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव दादर रेल्वे स्टेशनला दिले नाही म्हणून त्यांची जागतिक किर्ती, विध्वता कमी होणार नाही. परंतु त्यांच्या नावाला होणारा विरोध योग्य आहे का ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध जाती, धर्म, पंथ, संस्कृती असलेल्या भारत देशाला सक्षम संविधानाव्दारे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता या संविधानिक तत्वांवर देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महान, अनमोल कार्य केले आहे. म्हणून आपला भारत देश अखंड, सार्वभौमत्व आहे. बाबासाहेबांनी आयुष्यात अनेक वेळा जातीयतेचे भयानक चटके अनुभवले, मात्र घटनेत त्याचा कुठेही परामर्श त्यांनी जाणवू दिला नाही. या युगपुरुषांने अस्पृश्यांनाचं नव्हे तर, स्पृश्यांनाही पुनीत केले. दादर रेल्वे स्टेशन नामांतरचं नव्हे तर, इंदू मिल आंतरराष्ट्रीय स्मारकाचीही मागणी कित्येक वर्षे दुर्लक्षित होती. ११ अॉक्टोबर २०१५ रोजी मोठा गाजावाजा करत आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमी पूजन झाले असले तरी, पुढे काय ?

अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांनी आपल्या घटनाकारांची स्मारके निर्माण करुन त्यांचा यथोचित असा सन्मान केला आहे. बाबासाहेबांनी फक्त घटनाचं निर्माण केली नाही तर, भारत देशाच्या एकूण सर्वांगीण जडणघडणीत, भविष्यकालीन विकासात्मक वाटचालीत त्यांचे फार मोठे योगदान आहे. भारताच्या विकासाचा आराखडा बाबासाहेबांच्या नांवे आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतर रक्तरंजीत लढा अनेकांचे संसार उध्वस्त करुन, प्राणांची आहुती दिल्यानंतर, प्रदिर्घ १४ वर्षानंतर नामविस्तारावर प्रश्न संपुष्टात आला. आंबेडकरी जनतेची कोणतीही मागणी असो, न्याय असो तो संघर्ष केल्याशिवाय, रस्त्यावर येऊन रक्त सांडल्याशिवाय कधीच, काही सहज मिळालेले नाही. म्हणजे विकसनशील आंबेडकरी समाजांने आपल्या मागण्यांसाठी, न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन हिंसक बनावे, रक्त सांडवावे किंवा आपल्या प्राणाची आहुती द्यावी असेच शासन व्यवस्थेला अभिप्रेत आहे का ? ज्या महापुरुषांने समस्त उपेक्षित समाजाला जातीयतेच्या, विषमतेच्या बेड्यांतून मुक्त केले, त्यालाचं जातीयतेच्या कक्षेत बंदिस्त करुन ठेवणार आहात का ? पण, बाबासाहेब हे कोणत्याही जाती, धर्म, राज्य, देश याच्यात सामावणारे व्यक्तिमत्त्व नाही हे विरोधकांनी लक्षात घेतल पाहिजे.

सन २०११ मध्ये चैत्यभूमी नामांतर पुढे आले. त्यावेळी काही राजकीय मंडळींनी चैत्यभूमी नामांतराला विरोध करुन, कोणत्याही नामांतराला माझा विरोध राहिल असे सांगितले. तर, त्यानंतर दसरा मेळाव्यात चैत्यभूमी ? छट्... शब्दात चैत्यभूमी नामांतराला विरोध दर्शवून, नांव बदलून तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार नाही, असल्या भलत्या सलत्या मागण्या करु नका असे ठणकावले होते. मात्र व्हिटी टर्मिनसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला टर्मिनसचे लोकमान्य टिळक टर्मिनस, शिव रेल्वे स्टेशन, राममंदिर रेल्वे स्टेशन आणि प्रभादेवी रेल्वे स्टेशन अशी अनेक नामांतरे झाली असतांना मात्र त्यावेळी नामांतराला विरोध का झाला नाही ? फक्त जाहिर सभांमध्ये बाबासाहेबांचे फोटो मांडायचे, सोयीच्या राजकारणासाठी सभांमध्ये त्यांचे संदर्भ द्यायचे आणि दुसरीकडे त्यांच्याचं नावाला विरोध करायचा ही जातीय मानसिकता की राजकीय मानसिकता ? तसं पाहिले तर, सर्वचं राजकीय पक्षांनी नेहमीचं बाबासाहेब आणि आंबेडकरी समाजाबद्दल अनास्था दाखवून दिलेली आहे. बाबासाहेब आणि त्यांच्या समाजाचा तोंडी लोणचे लावतात तसा फक्त वापर झालेला आहे. नाही तर बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची मागणी असताना एवढी वर्षे लागली असती का ? चैत्यभूमीच्या नामांतराला विरोध करुन, इंदू मिलच्या जागेत नाना शंकर शेठ यांच्या स्मारकासाठी मागणी केली नसती. उड्डाण पूल, रस्ते, रुग्णालये अशा अनेक ठिकाणांची नामांतरे झाली आणि नविन होतं असतांना कोणाचाही कधी विरोध दिसून येत नाही आणि आंबेडकरी समाजांनेही कधी कोणत्याही नामांतराला विरोध केला नाही. मग फक्त बाबासाहेबांचा विषय आला की त्यांनाचं विरोधाभास का ? खरचं, बाबासाहेबांच्या नावाला विरोध म्हणजे धर्मनिरपेक्ष भारत देशाचीचं घोर शोकांतीका तर नाही ना ? कारण, जगाच्या पाठीवर बाबासाहेब एकमेव असे अजरामर दिग्विजयी, जागतीक विध्वता लाभलेले महान नेते आहेत, त्यांच्या पश्चात त्यांचे वाढते प्राबल्य कोणत्याही राजकीय पक्षांना, नेत्याला किंवा समाजाला सहन होणार नाही हे ह्यावरुन स्पष्ट होते. म्हणजेचं अजूनही जातीय मानसिकता अस्तित्वात असून, ती देशाच्या अखंडतेला आणि एकात्मतेला हे घातक आहे. त्यातचं, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि जातीय मानसिकतेमुळेचं सातत्याने बाबासाहेबांच्या नावाला विरोध होत हे स्पष्ट होते. जातीयतेचं नाही पण, जातीयता जगासमोर उघडी पडली तरी देशातील जातीय व्यवस्थेला त्याचं काहीच देणेघेणे नाही याचे आश्चर्य वाटते.

- मिलिंद कांबळे, चिंचवलकर
( लेखक समाजभूषण पुरस्काराने सन्मानित असून आंबेडकरी सामाजिक चळवळीत विशेष योगदान आहे )