
१ ऑगस्ट १९२० रोजी मातंग समाजातील भाऊ शिदोजी साठे आणि वालुबाई यांच्या पोटी आण्णांचा जन्म झाला.
घरची परिस्थिती गरिबीची व हलाखाची होती. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. अण्णा शाळेत फक्त दोनच
दिवस गेले. बाकीचे सर्व शिक्षण मुंबईच्या झोपडपट्टीतच झाले. आम्हीही ही माणसं आहोत, आम्हालाही सुखाने,
स्वाभिमानाने व स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार आहे. या न्याय मागणीने अण्णा पेटून उठले.
`माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`
ही त्यांची गाजलेली लावणी होती.
वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास करुन ते मुंबईत आले. पण पुढे १९६३ मध्ये अण्णांनी मुंबई ते मास्को हा प्रवास
विमानाने केला. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला
सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत
काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. ते म्हणायचे, `आपण
गलिच्छ वस्तीत रहात असलो तरी आपलं मन स्वच्छ असावे`. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि
अण्णाभाऊ साठे या तिघांनी १९४१, १९४२ मुंबई शहरावर अधिराज्य गाजविले. याच काळात बंगालमध्ये दुष्काळ
पडला होता. त्यावर अण्णांनी `बंगालची हाक' हा पोवाडा रचला. संयुक्त महाराष्ट्रलढ्यात त्यांनी कामगार जागा
करुन त्यांची एकजूट संघटना निर्माण केली. डॉ. आंबेडकरांच्या निर्वानानंतरचे त्यांचे कवन,
`जग बदल घालूनी घाव, गेले सांगून भिमराव'
प्रसिध्द झाले तर `फकिरा' ही कादंबरी डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अण्णांनी अर्पण केली होती. अन्यायाच्या
विरोधात पेटून उठणारी माणसे त्यांनी उभी केली. ग्रामीण पददलित लाचारीने जगणार्या माणसाचे साहित्य जीवन
त्यांनी समाजासमोर उभे केले. फकिरा, माकडीचा माळ, मास्तर, गुलाम, भुताचा माळ, वारणेचा वाघ या त्यांच्या
गाजलेल्या कादंबर्या. समाजाचा अचूक ठाव घेणारा लोकशाहीर म्हणून त्यांनी मान्यता मिळविली.
अण्णाभाऊंचं झोपडीवर अतिशय प्रेम होतं. ` जे जगतो तेच मी लिहितो` असं ते सांगत. ४५ कादंबर्या, १५०
कथा, तीन नाटके, ११ लोकनाट्ये, ७ चित्रपटकथा व असंख्य लावणी पोवाडे असे त्यांचे साहित्य प्रसिध्द
झाले. अण्णाभाऊ माटुंग्याच्या लेबर कँपमध्ये रहायचे. इथेच त्यांच्या प्रतिभेला बहर आला. कोणतीही ज्ञानाची
शिक्षणाची परंपरा इथे त्यांना लाभली नाही. आज त्यांचे साहित्य अनेक देशी-विदेशी संस्थांच्या अभ्यासक्रमाचा
भाग बनले आहेत. माटुंग्याच्या लेबर कँपमधील मंडळीं विशेषत: नाशिक, सातारा, नगर जिल्ह्यातून येऊन
स्थायिक झाले होते. बहुतेक गिरण्यात, गोदीत, नगरपालिकेत नोकरीला होती. इथेच अण्णाभाऊंची नाळ
कम्युनिस्ट पक्षाशी जोडली गेली. याच कँपच्या नाक्यावर `लेबर रेस्टॉरंट' होते. इथेच राजकीय पक्षांच्या
कार्यकर्त्यांचा अड्डा होता. या रेस्टॉरंटमध्ये आण्णाभाऊंनी डासावर पोवाडा लिहिला होता. टिटवाळा येथे १९४४
साली झालेल्या शेतकरी परिषदेत लालबावटा कलापथकाची स्थापना झाली. इथेच शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ
व गव्हाणकर एकत्र आले.
फाळणीच्या पार्श्वभूमीवर ते कळवळून सांगतात.
`द्या फेकून जातीयतेला । करा बंद रक्तपाताला ।
आवरोनी हात आपुला । भारतियांनो इभ्रत तुमची ईषेला पडली ।
काढा नौका । देशाची वादळात शिरली ।
धरा आवरुन एकजुटीने दुभंगली दिल्ली ।
काढा बाहेर राष्ट्रनौका ही वादळात गेली।`
गणातील कृष्ण आणि गवळणी त्यांनी काढूनच टाकल्या. लावणी व तमाशा लोकशिक्षणाकडे
वळविण्याचे श्रेय आण्णाभाऊंकडेच जाते. १९४८, १९६१ साली त्यांनी रशियास जाण्याचा प्रयत्न केला त्यास
यश आले नाही. पण जेव्हा ते रशियाला जाणार हे नक्की झाले तेव्हा आपल्या महाराष्ट्रातून प्रचंड आर्थिक मदत
झाली. वाटेगावहून मुंबईत वडिलांच्याबरोबर पायी चालत आलेला आण्णा विश्वासाने एकटा विमान प्रवास करुन
रशियाला गेला तत्पूर्वीच त्यांनी `चित्रा' ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती. `सुलतान` ही कथा
लोकांना आवडली होती. तर `स्टालिनग्राडचा पोवाडा` रशियात लोकप्रिय झाला होता. या पार्श्वभूमीवर रशियात
गेल्यानंतर त्यांचं प्रचंड स्वागत झालं. त्यांनी मुंबईची लावणी लिहून वास्तववादी भीषण अशा मुंबईच्या विषमतेचे
दर्शन घडविले `फकिरा` कादंबरीच्या १६ आवृत्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त झाली. जगातील
व भारतातील २७ भाषांमध्ये अण्णांच्या साहित्याचे भाषांतर झाले. १९४९ साली अण्णाभाऊंनी `मशाल'
साप्ताहिकात `माझी दिवाळी` नावाची पहिली कथा लिहिली तिथून त्यांचा साहित्य प्रवास सुरु झाला.
जगण्यासाठी लढणार्या माणसांच्या अण्णांभाऊंच्या कथा आहेत. ते १९५७ मध्ये झालेल्या दलित साहित्य
संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.
आज १ ऑगस्ट
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा .