जेथे लढा, आंदोलने तेथे प्रा. गोपाळ दुखंडे सर असे समीकरण बनून गेल्याचा एक काळ मुंबई-महाराष्ट्राने
पाहिला आहे. एकदा भूमिका पटली की मग प्रश्न कोणताही असो सरांसाठी तो महत्त्वाचा लढा बने. हातचे राखून
न ठेवता झोकून देऊन काम करणे, हेच या आजीवन लढवय्या साथीने तहहयात केले.
मधुमेहाच्या व्याधीने शरीर साथ देईनासे झाले, तरी डोंगरदऱ्या, गावे पालथी घालणारी त्यांची भ्रमंती अथकपणे
सुरू असे. १९८८ साली कोकण पदवीधर मतदारसंघाची पहिली निवडणूक, खासदार-आमदारकीची अपयशी
का होईना दोन-तीनदा निवडणूक ते लढले. पण हाडात भिनलेला कार्यकर्ता काही त्यांनी मरू दिला नाही. वाद-
संवाद, भूमिकाच नसणे, प्रश्न संपणे, प्रश्नांनी सतावणे संपणे, त्यावर तोडग्यासाठी धडपड-चीड थंडावणे हे भयंकर
दोष घेऊनच आजचे समाजजीवन सुरू आहे. दुखंडे सरांसारख्या चळवळ्या माणसाला हे मानवणे शक्यच
नव्हते. या मरणयातना भोगायला लागण्याआधी दुखंडे सर गेले हे एकापरीने बरेच झाले म्हणावे.त्यांचे सावंतवाडी
येथे दि 13.06.2017 रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले
त्यांचे वडील गिरणी कामगार, लहानपणापासून संघर्ष करीत दुखंडे सरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. गोरेगावहुन
ते सकाळी भिवंडी कॉलेजला नोकरीसाठी जात असत. आणि तिथून सुटल्या नंतर जनता दल, छात्रभारती आणि
इतर सामाजिक, राजकीय कामासाठी वेळ देत असत. युक्रांद या युवक चळवळी मधून त्यांनी कामाला सुरुवात
केली होती.
कोकणाच्या प्रश्नावर प्रचंड आस्था असलेले ते होते. परळच्या दामोदर हॉलच्या पटांगणात त्यांनी कोकणी बाजार
पेठ भरविली होती. कोकण रेल्वे येण्याकरीता झालेल्या प्रत्येक आंदोलनात दुखंडे सर होते. कोकणातील मुलाला
कोकण रेल्वेमध्ये नोकरी मिळावी म्हणून अभिजीत हेगशेटये, युयुत्स्य आर्ते या छात्र भारतीच्या मुलांना घेऊन
त्यांनी "कोकण रेल्वे जनाधिकार समिती"ची स्थापना केली होती.
प्रा.मधू दंडवते यांचे ते निकटचे सहकारी होते. मालवण विधान सभा मतदार संघातून त्यांनी 1995 साली नारायण
राणे यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती.
मुंबई विद्यापीठात ते सिनेटचे सदस्य होते.मुंबई विद्यापीठाचा कारभार मराठीत चालावा याचा ते प्रत्येक सभेत
आग्रह धरीत. कोकणामध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र झाले पाहिजे याचा त्यांनी छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या
माध्यमातून आग्रह धरला आणि रत्नागिरी येथे ते उपकेंद्र मंजूर करून घेतले.
छात्रभारतीच्या मुंबईच्या कामात त्यांनी पहिल्यापासून लक्ष घातले होते. कपिल पाटील,शरद कदम या त्यावेळच्या
विद्यार्थी नेत्याना हाताशी धरून त्यांनी अनेक आंदोलने उभी केली.
रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा छात्र भारतीने काढलेला रात्रीचा पहिला बॅटरी मोर्चा, त्यावेळचे महापालिका उपायुक्त
गो. रा.खैरनार यांना घेऊन रुईया कॉलेजच्या नाक्यावर कुलगुरू डॉ.कर्णिक यांच्या विरोधात केलेले आंदोलन,
गिरणी कामगारांच्या लढाईत दत्ता इस्वलकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेला चड्डी बनियान मोर्चा, भारतमाता
सिनेमा वाचविण्यासाठी झालेले आंदोलन, नामांतर लढा, मंडलआयोग स्थापन करण्यासाठी झालेल्या प्रत्येक
लढाईत प्रा.दुखंडे सर पुढे असत. जनता दलाचे ते काही काळ प्रदेश सेक्रेटरी होते.
नेत्यांपासून-तळच्या माणसांपर्यंत प्रबोधनाचा दुवा, कसलीही भीड न बाळगता अभ्यासपूर्ण मांडणी करणारा
सडेतोड वक्ता, सहकाऱ्यांसाठी जिवाभावाचे मित्र, तर तरुणांमध्ये समरसून जाणारा मार्गदर्शक सोबती अशा
त्यांच्या भूमिका राहिल्या. विद्यार्थी-प्राध्यापकांच्या प्रश्नांसह शिक्षणाधिकाराचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, विकास विरुद्ध
पर्यावरण, जातीभेद, असंघटित मजूर, त्यांचे आर्थिक लढे वगैरे कोणताही संघर्षांचा प्रश्न त्यांच्यासाठी वज्र्य
नव्हता. नामांतराच्या प्रश्नावर, गावागावांतील जातीय दंगली, अत्याचार, बलात्कार यांना शहरी आणि विशेषत:
दलितेतर समाजघटकांमध्ये संवेदना जागविण्यात सरांची मोलाची भूमिका राहिली.
प्रा गोपाळ दुखंडे सरांना आणि त्यांनी केलेल्या झंझावाती समाज प्रबोधन आणि आंदोलनाला विनम्र अभिवादन !