रामदास आठवले दलित समाजाला लागलेली एक कीड रामदास आठवले दलित समाजाला लागलेली एक कीड - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Sunday, October 4, 2020

रामदास आठवले दलित समाजाला लागलेली एक कीड







कुठलाही समाज जेव्हा प्रगतीच्या मार्गावर चालत असतो तेव्हा त्याला अधोगतीला नेण्यासाठी जास्त काही करावं 

लागत नाही; फक्त एका नतद्रष्ट माणसाला त्या समाजाचा पुढारी म्हणून नेमायचं आणि पुढचं कार्य तो नतद्रष्ट 

पुढारी स्वतःहून करत जातो आणि समाजाला खड्डयात ढकलून मोकळा होतो. फुले-शाहूंच्या विचारांच्या महाराष्ट्रात 
दलित समाजात जन्मलेल्या डॉ. आंबेडकरांनी भारत देशाला राज्यघटना दिली. या राज्यघटनेत न्याय, मानवी हक्क, 

स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही मूल्ये प्रत्येक वाक्यात आढळतात. डॉ. आंबेडकरांच्याच समाजात जन्मून जर 

कुणी त्यांच्या राज्यघटनेतल्या मूल्यांना आणि त्यांच्या चळवळीला कुणी वैयक्तिक स्वार्थासाठी स्वस्तात विकले 

असेल तर त्या पुढाऱ्याचं नाव म्हणजे रामदास आठवले!

विद्यार्थी आंदोलनातून सुरुवात करत तेव्हाच्या दलित पँथरच्या मातब्बर नेत्यांना मागे सारून काँग्रेसच्या वळचणीला 
जात आठवले (Ramdas Athawale ) वयाच्या तिसाव्या वर्षी थेट राज्याचे सामाजिक न्यायमंत्री झाले, आणि 

त्यासोबतच आठवलेंनी अख्खा दलित समाज आणि चळवळही सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधून टाकली. लहान 

वयात मंत्रिपदाने मिळालेल्या सुखसोयी आठवलेंच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर एक कायमची झापड लावून गेल्या. 

सत्ताधारी लोकांच्या गैरसोयीची कुठलीही गोष्ट करायची नाही किंवा बोलायची नाही हा दंडक पाळत त्यांनी स्वतःचं 

मंत्रिपद शाबूत ठेवलं आणि त्या पदाच्या जोरावर समाजावरची पकड अजूनच मजबूत केली. राज्यात युतीची सत्ता 

आली तेव्हा आठवलेंनी सेनेसोबतही मागच्या मार्गाने जुळवून घेतले आणि स्वतःचं महत्व राखून ठेवलं.

मनोहर जोशींच्या काळात सरकारी शाळेत जातीनिहाय वेगळ्या रंगाचे गणवेश आणायचा घाट घातला गेला तेव्हा 

आठवले विरोध वगैरे न करता शांत राहिले. रमाबाई आंबेडकर नगरचा गोळीबार झाला तेव्हा आठवले काही 

दिवस तिकडे फिरकले नाहीत आणि नंतर जेव्हा ते तिकडे गेले तेव्हा लोकांनी त्यांचा चांगला समाचार घेतला. 

आठवलेंनी ना लोकांना विरोध केला, ना सत्ताधाऱ्यांना. त्यांनी फक्त स्वतःच्या वैयक्तिक फायद्याचा विचार केला 

आणि शांत राहून वेळ मारून नेली. रमाबाई आंबेडकर नगरच्या घटनेत कसलीही मोठी कारवाई दोषी पोलीस 

अधिकाऱ्यांवर झाली नाही कारण दलित समाजाचा सगळ्यात मोठा पुढारीच काही करत नव्हता. काँग्रेसने ज्या 

कारणासाठी आठवलेंना मोठे केले तेच काम त्यांनी युतीशी जुळवत घेत चालू ठेवले.

पुढे आठवले 1998 ते 2009 या काळात खासदार बनून 11 वर्षे काँग्रेसच्या इशाऱ्यावर काम करत राहिले. 2006 

साली खैरलांजी हत्याकांड घडले तेव्हा आठवले केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असणाऱ्या काँग्रेससोबत युती 

करून खासदार होते, पण त्यांनी त्या प्रकरणात पीडित परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःचं कुठलंही 
राजकीय वजन वापरलं नाही. पुढे खर्डा, जवखेडा, सोनई अशी कित्येक दलित अत्याचाराची प्रकरणे राज्यात 

घडली तेव्हाही आठवले शांतच होते. 2009 ते 2014 या काळात खासदारकी नसतानाही आठवले कुठल्याही 

अत्याचाराच्या प्रकरणात जमिनीवर उतरले नाहीत, तर फक्त दिल्लीत वेगवेगळ्या पक्षांच्या मागे लागून राज्यसभेत 

जायचा प्रयत्न करत राहिले.

2014 साली लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आठवले भाजपकडून राज्यसभेवर गेले आणि गेले 6 वर्ष मोदींचे 

गुणगान करत लाचार होऊन जगत आहेत. या लाचारीचे फळ म्हणून 2016 ला त्यांच्याकडे समाजकल्याण खात्याचे 

केंद्रीय राज्यमंत्रीपदही देण्यात आले. या पदावर बसून आठवलेंनी अजून तरी कसलेही भरीव कार्य केलेले नाहीये. 

न्यूज चॅनेलवर आणि चक्क संसदेत स्वतःच्या फालतू कविता म्हणून दाखवत आठवलेंनी स्वतःचं आणि आंबेडकरी 

चळवळीचं भारतभर हसे करून ठेवलं आहे. जेव्हा एखाद्या समाजाचा सगळ्यात मोठा पुढारी विदूषक असतो, 

तेव्हा त्या समाजाला आणि त्या चळवळीलाही कुणी गंभीरपणे घेत नाही. डॉ. आंबेडकरांची चळवळ आणि विचार 

ही महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजाची ओळख होती, ती आठवलेंनी स्वतःच्या ठिल्लर कवितांनी आणि भाषणांनी 

पद्धतशीरपणे पुसून टाकली.

गेल्या काही महिन्यात उत्तर प्रदेशातून जातीय आणि महिला अत्याचाराच्या कित्येक भयंकर बातम्या येत आहेत. 

कानपूरमधल्या एका अनाथाश्रमात 5 बालिका गरोदर असल्याची बातमी मीडियाने दाखवली पण आठवले शांत. 

चित्रकूटमध्ये खाण माफिया 100-200 रुपयांसाठी कित्येक बालिकांचे लैंगिक शोषण करत असल्याची स्टोरी TV 

Today ने केली, त्यावरही आठवले शांतच. मग काय, उत्तर प्रदेश सरकारने पूर्ण प्रकरणच दाबून टाकले. आता 

हाथरसमध्ये दलित मुलीवर गॅंगरेप होऊन खून झाला, पोलिसांनी तिचे प्रेत नातेवाईकांना न दाखवता मध्यरात्री 

जाळून टाकले, दोषींना पाठीशी घालण्याचा पूर्ण प्रयत्न उत्तर प्रदेश पोलीस करत आहेत हे मीडिया कोकलून सांगत 

आहेत .... तरीही आठवले शांतच!!

राजकारणात तडजोडी असतात हे सर्वांना माहीत आहे, पण त्या तडजोडी तात्कालीक असतात आणि स्वाभिमान 

विकून केल्या जात नाहीत. आठवले हे राजकीय तडजोड करत नाहीयेत, तर सत्तेत राहण्यासाठी गेली काही दशके 

विशुद्ध लाचारीचे जीवन जगत आहेत, ज्यासाठी त्यांनी स्वतःच्या मागे उभ्या असणाऱ्या समाजाची मते, आंबेडकरांचे 

विचार आणि एकूणच दलित चळवळीचा मोठा सौदा करून ठेवला आहे. आजही आठवलेंच्या मागे खूप कार्यकर्ते 

असतात कारण ते लोकांची कामे करून देतात अशी त्यांची ख्याती आहे. पण कार्यकर्त्यांची वैयक्तिक फायद्याची 

कामे आणि आठवलेंची राजकीय कारकीर्द ही जर दलित, अनाथ मुलींच्या अब्रू लुटण्याकडे दुर्लक्ष करण्याची 

किंमत देऊन येत असेल तर दलित समाजाने विचार करण्याची वेळ आलेली आहे.

हाथरसच्या पीडितेला, कानपूर-चित्रकूटच्या मुलींना न्याय न देता देशाची सामाजिक न्यायमंत्री आठवले कंगना 

आणि पायलला सुरक्षा पुरवण्यात गर्क आहेत. सोबतच स्वतःचा पक्ष अस्तित्वातही राहिला नसताना ते शिवसेना 

आणि राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपसोबत यायला बोलवत आहेत, जणू काही हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष वगैरे असावेत. 

आठवलेंनी लाचारीची, हुजरेगिरीची आणि राजकीय निर्लज्जपणाची परिसीमा गाठली आहे. रामदास आठवले ही 

महाराष्ट्र आणि देशातील दलित समाजाला लागलेली कीड आहे, आणि या किडीला नाकारणे ही काळाची गरज 

आहे!

साभार - डॉ. विनय काटे






No comments:

Post a Comment