हेलो...! हेलो...! मी लहुजी साळवे बोलतोय.. हेलो...! हेलो...! मी लहुजी साळवे बोलतोय.. - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Monday, February 17, 2020

हेलो...! हेलो...! मी लहुजी साळवे बोलतोय..

<img src="kranti-veer-lahuji-vastad-salve.jpg" alt="vastad lahuji salve calls mi lahuji salve bolatoy"/>



तसा आज देखील फोन खनखनू लागला. मी कंटाळा करणार होतो परंतु अंगावरचं गोदडं झटकून तटकन

उठलो. मला ज्या ज्या वेळी कंटाळा येतो तेव्हा मी उठतोच. आजही तसंच केलं. उठलो. देवळीतला मोबाईल 

किलकिलतच होता. डोळे चोळत-चोळत कोण असेल बुवा... म्हणून न्याहळू लागलो. लहुजी साळवे... लहुजी 

साळवे... असं इंग्रजीतून नाव वळवळू लागलं. जनरली मोबाईल मध्ये सेव्ह केलेली नावे आठवतातच परंतु ह्या 

नावाने तर कुणाचा नंबर सेव्ह केलेला नाही असं मला क्लिक होवू लागलं. मोबाईल कट केला आणि पुन्हा 

गोदड्यात शिरलो. सतत-सतत त्याच विषयावर चर्चा झाल्याचा परिणाम असावा असं मत बणवून खुंडमूंड झालो. 

फोन पुन्हा वाजू लागला. मी काहींसं चिडक्या मुडात आलो होतो. बेल सतत वाजू लागल्यामुळे बायको उठली 

अनं फोन उचलून अंगावरचं गोदडं हिसकावून हातात फोन डकवला. डोळे चोळत-चोळत स्क्रीन निरखु लागलो. 

बघतो तर काय पुन्हा तोच फोन. आता मात्र पुरता भानावर आलो होतो. बघूयात तर खरं म्हणून फोन कानाला 

लावला तर तिकडून आवाज आला, हेलो...! हेलो...! मी लहुजी साळवे बोलतोय...!

मी: कोण..! लहुजी साळवे..!

लहुजी: हो..! हो...! मी लहुजी साळवेच बोलतोय.

मी: म्हणजे, आम्ही जे आमचं दैवत माणतोय तेच का...! विर वस्ताद लहुजी बुवा साळवे..!

(मोबाईलवर हात दाबत, अरेच्चा आता काय बोलावं...! खरं का खोटं..! का कुणी मजाकबिजाक तर करत 

नसावं..!) मला थंडीत घाम सुटला होता. मन एकवटून ठरवलं चला कुणी का असना, आपूण लहुजी बुवा 

समजूनच बोलायचं. मी आता बऱ्यापैकी भानावर आलो होतो. टावेल गुंडाळली. दरवाजा हलकासा ओढून घेतला 

आणि चक्क रस्त्यावर आलो. एरव्ही बोंबलणारी कुत्री कुठल्या तरी खुस्पाटात शिरल्यामुळे गल्ली शांत होती. मी 

आता निवांत बोलण्याच्या मूडमध्ये आलो होतो.

मी: बोला बाबा..बोला...! कसे आहात..!

लहुजी बाबा: माझं इकडं बेस चाललयं बघ.

मी: बरं..बरं..! अजून काही खास..!

लहुजी बाबा: अरं इकडं असं खास बिस कायबी नसतं.

मी: नाय... तरी देखील विषेश..!

लहुजी बाबा: छे..! छे..! कशाचं विषेशबिशेब कायच नाय. उगी अंधारवादी लोकं भलत्याच गोष्टी डोक्यावर 

रचतात..!

मी: म्हणजे..! बाबा मी नाय समजलो..!

लहुजी बाबा: अरं हे रे...मेल्यावर स्वर्गात वगैरे गेल्यावर वगैरे..!

मी: म्हणजे.. म्हणजे.. बाबा तुम्ही स्वर्गातून वगैरेच बोलताय ना..!

लहुजी बाबा: अरं कसला डोंबल्याचा स्वर्ग..! सगळं बकवास..! मुर्खांना अधिक मुर्ख बणवून शोषण करण्यासाठी 

स्वर्गाचं चॉकलेट दाखवलं जातं. खरा स्वर्ग तोच..!

मी: तोच म्हणजे..! म्हणजे.. बाबा..!

लहुजी बाबा: अरं तोच जिथून तु बोलतोस..!

मी: म्हणजे.. बाबा.. प्रुथ्वीवरुन..आपल्या.! आपल्या..! भारतातून.. नाय..नाय..आपल्या 

महाराष्ट्रातून..नाय..नाय..आपल्या त्या.. त्या..

लहुजी बाबा: अरं हो..बाबा.. आपला भारत..महाराष्ट्र.. परभणी.. पुणे...मांगवाडा..

मी: म्हणजे.. हाच खरा स्वर्ग बाकी बकवास वगैरे..

लहुजी बाबा: हो..बिलकूल बकवास परंतु काही दुष्ट लोकांनी स्वतःला सुरक्षित होण्याच्या दुष्ट हेतूने भोळ्या 

भाबड्या देशवासीयांना देव, धर्म, स्वर्ग, नरक अशा भ्रामक संकल्पना डोक्यात घातल्या आणि कमजोर 

विचाराच्या लोकांनी त्याच भ्रामक कल्पनेच्या परिपूर्ती साठी आयुष्य खर्ची घातले.

मी: बरोबर बाबा.. तुम्ही म्हणता तेच खरं आहे परंतु लोकांना खरं पटत नाही.

लहुजी बाबा: त्यात लोकांचाही दोष नसतो, कारण सत्य हे आकर्षक नसतं, अवास्तव नसतं त्यामुळे लोकांना 

रुचत नाही. आकर्षक, अवास्तव, रंजक आणि मतलबाच्या गोष्टीची लोकांना गोडी वाटते. ह्या गोडीतूनच भ्रामक 

संकल्पना विकसित होत आल्या आहेत.

मी: खरंय.. खरंय.. बाबा..!

लहुजी बाबा: काय खरंय..का नुसतीच वाय..!

मी: नाय..नाय... बाबा तुमच्या संग कशी वाय जमंन..!

लहुजी बाबा: माझ्या संग...! आरं अंबूजं कुणासंगट बी वाय करत्यात. रेघाळं भेटलं कि तेच्यासंग बी वाय.. 

दांडाळ भेटला कि तेच्यासंग बी वाय...भुकर भेटला की तेच्यासंग तेच्यासारखी वाय करतेत अंबूजं..! कालच्या 

निवडणूकीसारखी..

मी: म्हणजे, बाबा तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातील निवडणूकीत झालेली वाय बी कळली कि काय.. म्हणजे टिव्ही 

वगैरे पाहून..!

लहुजी बाबा: ढेकळाची टिव्ही वगैरे...कालपासून तो इनामदार इकडे आलेला आहे, आल्यापासून तेच सुरू आहे.

मी: काय म्हणतात इनामदार..?

लहुजी बाबा: तेच ते भाजप ला शिवसेनेने विरोध केला, शिवसेनेला राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस कसं चूयत्या 

बणवित आहे असं भलतचं काही तरी त्याच्याकडून सुरू आहे, मला काय इंट्रेस येईना झालाय कारण आमच्या 

वेळी हे कुणी पक्ष-फिक्शं नव्हते. जोतिबा फुले आणि आमचा एकच धंदा, शूद्रांना शिक्षण.

मी: दुसरं कुणी शुद्राना शिकवित नव्हते काय..?

लहुजी बाबा: शूद्रांना...! अरं ते स्वतःच्या मुलींना शिकवित नव्हते. तर शुद्रांचा विचार सोड.

मी: ते फक्त मुलांनाच शिकवित होते काय..?

लहुजी बाबा: होय..तेही ब्राह्मण मुलांना.

मी: अनं ब्राह्मण मुलींना..?

लहुजी बाबा: छे..छे..! "क्षुद्र पशू नारी, ए सब ताडन के अधिकारी" हा त्यांचा न्याय.

मी: अरे बापरे..!

लहुजी बाबा: म्हणूनच आम्ही ठरविले, शिक्षण देवूत ते पहिल्यांदा महिलांना.

मी: मग दिले काय..?

लहुजी बाबा: बिलकुल... तेही शूद्र मुलींना.

मी: मग काय फरक पडला..?

लहुजी बाबा: काय फरक पडला..! अरं..पुणं हादरून गेलं. त्यांच्या धर्मावर चालविलेल्या घनाचा तो पहिला घाव 

होता. जोतीरावांना ठार मारण्याचा कट शिजला.

मी: मग..?

लहुजी बाबा: मग काय कुणाची बिशाद, ज्योतीला हात लावायची.

मी: नाही का लावला मग..!

लहुजी बाबा: कसे लावणार..! जे झाड मी वाढवले त्या झाडावर पडणारी कुऱ्हाड मी माझ्या मानेवर घेण्याची 

तयारी ठेवली होती.

मी: तुम्ही वाढवले म्हणजे..?

लहुजी बाबा: मीच झाड वाढवले. ते लेकरू श्रीमंत घरातून आलेलं. गरीबी आणि पुण्यातील छलकपट काहीच 

ठावूक नाही. मी हे सगळं त्यांच्या ध्यानात आणून दिलं.

मी: मग काय झालं..?

लहुजी बाबा: मग काय..! "एकच ध्यास, शुद्रांचा विकास"

मी: झाला काय..?

लहुजी बाबा: मग काय आमचा हेतू इंग्रज सरकारच्या लक्षात आला आणि सरकारने आम्हाला मदत केली.

मी: म्हणजे तुम्हाला इंग्रजांनी मदत केली..?

लहुजी बाबा: इंग्रजांनी कुणाला मदत केली नाही..?

मी: नाही परंतु इंग्रजांची मदत वगैरे..!

लहुजी बाबा: आरं मी तेच म्हणतो आहे, इंग्रजांनी कुणाला मदत केली नाही..! आणि इंग्रजांना भारतात आणले 

कुणी..?

मी: कुणी आणले..?

लहुजी बाबा: ह्यांनीच..! बंगालचा नबाब सिराज उदोला इंग्रजांविरुद्ध लढत होता तेव्हा इंग्रजांना कुणी साथ 

दिली..? यशवंतराव होळकर यांनी पेशव्यांचा पराभव केल्यानंतर वसईचा तह कुणी कुणासोबत केला..? 

पेशव्यांनी इंग्रजांसोबत तह करून इंग्रजांना पुण्यात घेऊन आले. म्हणजे इंग्रजांना थारा देणारे पेशवेच.

मी: अर्थात, तुम्ही इंग्रजांविरुद्ध लढलात..?

लहुजी बाबा: कशाला लढू..! ते इंग्रजांना घेऊन येतील आणि आम्ही लढावं.. कशासाठी..?

मी: म्हणजे तुम्ही लढला नाहीत..?

लहुजी बाबा: कशासाठी..? कुणासाठी..?

मी: देशासाठी..?

लहुजी बाबा: त्या वेळी देश नव्हता. भारत एक वसाहत होती आणि इथं राजे आणि सरदार होते.

मी: बाबा मला काही सुचत नाही.

लहुजी बाबा: आरं भल्या भल्यांना सुचनार नाही.

मी: बाबा मी पागल झालोय..!
लहुजी बाबा: पागलच होशील...इथं फक्त एक राजा दुसऱ्या राजा सोबत युद्ध करायचा आणि ह्या सगळ्या राजा लोकांनी एकमेकांची जिरविण्यासाठी इंग्रजांचा सहारा घेतला आहे आणि इंग्रजांकडून शिकून घेतले की पुन्हा हे वर टंगडी करून..

मी: वर टंगडी म्हणजे..?

लहुजी बाबा: वर टंगडीच..!

मी: म्हणजे कशी..?

लहुजी बाबा: इंग्रजांसोबत कुणी-कुणी तह केले..? कुणी-कुणी सरदारक्या मिळविल्या..!

मी: मला नाही सांगता येणार.

लहुजी बाबा: तीच तर अडचण आहे ना.. तुला मला नाही बोलता येणार. पण इतिहास बोलू शकतो ना..!

मी: इतिहास काय बोलणार..?

लहुजी बाबा: मी जे बोलतोय तो इतिहास नाही का..?

मी: होना बाबा.. तुम्ही आमच्या साठी इतिहास, भुगोल सर्व काही..!

लहुजी बाबा: बस उगी वाय करु नगं.

मी: बाबा.. त्यात वाय कसली..?

लहुजी बाबा: वायंच रे सारी..तुम्ही सगळे माझं नाव घेतात, माझ्या नावानं शंभरीक संघटना काढतात आणि 

शेंड्या राखतात.

मी: नाही बाबा.. आम्ही कुणी शेंड्या ठेवत नाहीत.

लहुजी बाबा: आरं तुम्ही ठेवत नसताल परंतु पुण्यात येवून बघ, बऱ्याच मांगाची पोरं शेंड्या वाढवून बसलेत ना..!

मी: पुण्यातल्या पोरांना आम्ही कसं सांगणार बाबा.. आणि ते आमच्या खेड्यातल्या लोकांचे कसे ऐकतील..?

लहुजी बाबा: खरं आहे ते तुमचं ऐकणार नाहीत. ते मला आणि ज्योतीला पार विसरून गेलेत.

मी: तुम्हालाच काय ते अण्णा भाऊ साठे यांना देखील विसरलेत.

लहुजी बाबा: आता हा अण्णा भाऊ साठे कोण.?

मी: बाबा हे असचं तर चालू आहे ना.. अजून आपल्याच लोकांना अण्णा भाऊ साठे माहीत नाही, जसं तुमच्या 

घरचे तुम्हाला विसरलेत तसं अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या घरचे विसरलेत.

लहुजी बाबा: काय ते मला सविस्तर सांगशील काय.?

मी: अण्णा भाऊ साठे यांनी तुमच्या सारखेच संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आणि त्यांचे वारसदार ज्यांनी अण्णा 

भाऊ साठे यांना जेलमध्ये घातलं त्यांचा प्रचार करु लागलेत.

लहुजी बाबा: इतका दुबळेपणा..?

मी: अण्णाभाऊंच्या नातेवाईकांनी अण्णाभाऊंची कवडीमोल दराने निलामी काढली आहे.

लहुजी बाबा: आणि माझ्या नातेवाईकानी..?

मी: त्यांचं तर विचारच नका, ज्या भटबामनशाहिच्या विरोधात तुम्ही लढलात त्यांच्या तालमीत जावून तुम्ही 

शिकविलेले लष्करी धडे भटाबामनांना देत आहेत.

लहुजी बाबा: ही तर माझ्यासोबत गद्दारीच आहे.

मी: काहीच शिल्लक ठेवले नाही. अगदी त्यांच्या कळपात जावून तुम्ही आणि जोतीरावांनी तयार केलेले मांगवाडे 

सुपडासाफ करून टाकले आहेत.

लहुजी बाबा: म्हणजे आता तिथं माझं काहीच शिल्लक नाही का..?

मी: आहे ना..! तुमचं नाव. तुमचा फोटो मांडून संघाचे वर्ग भरत आहेत.

लहुजी बाबा: तोबा..तोबा..! हा तर फारच उलटा प्रवास सुरु आहे.

मी: आणि तुमच्या पुण्यात पिकत असलेले आमच्याकडे पाझरत आहे.

लहुजी बाबा: तुम्हाला हे रोखता येत नाही का.?

मी: आमचं कोण ऐकणार..! आम्ही पडलो खेड्यातले..

लहुजी बाबा: आरं पण ह्या मुर्खांना हे कसं कळत नाही, ज्यांनी हजारो वर्षांपासून आमचं शिक्षण अडवून ठेवलं, 

सत्ता संपत्तीचा अधिकार नाकारुन आम्हाला ह्या थराला आणून ठेवलं, त्यांच्या वळचणीला जावून त्यांच्या 

पालखीला खांदा देणे म्हणजे उजेडाकडून अंधाराकडे वाटचाल असं होणार नाही का..!

मी: तसंच सुरू आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त. इतकचं काय, जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी अशी 

प्रतिज्ञा केली आणि संपूर्ण हयात इंग्रजांच्या विरोधात लढण्यात तुम्ही घातली अशा कथा सांगितल्या जात आहेत, 

त्या खऱ्याच असणार ना..!

लहुजी बाबा: डोंबल्याचं खरं, मी जर इंग्रजांच्या विरोधात लढलो असतो तर इंग्रजांनी मला सोडले असते का..? 

फासावर लटकावले असते किंवा त्या युध्दात हरलेल्या सरदारांसारखे मला देखील माझा मुलूख सोडून परांगदा 

व्हावे लागले असते, मी पुण्यात राहून काम करू शकलो असतो का..?

मी: ते तर सगळं काम जोतीरावांनी केले आहे असं म्हणतात.

लहुजी बाबा: हो..हो..ते सगळं काम जोतीरावांनीच केले आहे हे खरं आहे परंतु ते त्यांना कारणीभूत कोण आहे 

याचा विचार करणार की नाही..?

मी: म्हणजे..?

लहुजी बाबा: आरं बाबा जोतीराव म्हणजे पुण्यातील फार मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचं लेकरू होतं. गरीबी, 

अश्प्रुषता जोतीरावांना ठावूक होती का..? ह्या सगळ्या जाणिवा जोतीरावाच्या डोक्यात कुणी घातल्या..?

मी: त्यांच्या डोक्यात तुम्ही घातल्या म्हणतात, मग तुम्हीच का ते करू शकला नाहीत..?

लहुजी बाबा: नाही.. नाही.. ते काम करण्यासाठी जोतीरावच हवे होते. नुसता विचार करून साध्य होत नाही, 

साध्य करण्यासाठी योग्य लिडर लागतो आणि माझ्यासाठी जोतीराव परफेक्ट होते. आता हे बघा, जोतीराव 

लिहितात, जे मी लिहू शकणार नाही,

"मांगास बहुत पिढले

सजीव दडविले, गढीच्या पाया ।

लेश उरले, उष्टे मागा ।

नाही ज्यागती आर्य न्यायात ।

मांगानो, सत्तेविन सकळ कळा ।

झाल्या आवकळा, पुसा मनाला ।

मांग बंधुनो, तुम्ही राज्यकर्ते आहात।

सत्ता मिळवा।

किंवा

"आर्ये जेरदस्त मांग म्हारा केले।

पाताळी घातले। स्पर्शबंदी।

धूर्त ऋषीजींनी वेदास रचिले।

द्वेषाने छळीले सीमा नाही।

अन्नाविन बहू उपासाने मेले।

उष्टे नाही दिले। हेवा मुळ।

सद्विवेकास आर्यांनी त्याजिले।

त्यांचे हाल केले। जोती म्हणे।

असं जे जे काही लिखाण जोतीरावांनी केले त्यासाठीचा इतिहास जोतीरावांना आम्ही सांगत असू.

मी: बाबा आणखी काय काय तुमच्या अनुशंगाने सांगण्यासारखे आहे.

लहुजी बाबा: खूप काही. जसे की, १ जानेवारी १८४८ साली वेताळपेठेत काढलेली अश्प्रुषांसाठीची पहिली शाळा माझ्या तालमीजवळ काढली होती कारण ती शाळा माझ्या संरक्षणाखेरीज चालने शक्य नव्हते. ही शाळा सुरू करण्यापूर्वी मी आणि जोतीराव अहमदनगर येथे जावून मिसेस फरेरा यांनी सुरु केलेली मुलींची शाळा पाहून आलो होतो. पुण्यात येवून आम्ही अश्प्रुश्य मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली. २५ डिसेंबर १८४७ साली पुण्यातील फुले वाड्यासमोर झालेल्या शिक्षण परिषदेचा मी अध्यक्ष होतो.एका-एका मांगवाड्यात आणि महारवाड्यात जावून आम्ही लोकांना तयार केले आहे. काय-काय म्हणून सांगू. संपूर्ण आयुष्याचा लेखाजोखा कोण ठेवणार..! कारण आमच्या पासूनच शिक्षण सुरू झालेलं आहे.

मी: बाबा तुम्ही तर शिक्षणाच्या पवित्र कार्यात सहभागी झाले होते मग पेशव्यांच्या सोबत तुम्ही अथवा तुमचे पुर्वज 

वगैरे..

लहुजी बाबा: माझे पुर्वज सैन्यात होते परंतु शिवाजी महाराजांच्या. पेशव्यांच्या सैन्यात आम्ही कसे सहभागी असू 

शकतो. पराकोटीचा बाट, भेदभाव करणाऱ्या पेशव्यांच्या सोबत असतो तर माझ्या मुक्ताच्या निबंधात तसं आलं 

असतं का..? आरं तुम्ही तो मुक्ताचा निबंध वाचला नाही का..?

मी: वाचला ना बाबा... परंतु ते तुमचे पुण्यातील अनुयायांनी वाचला की नाही..?

लहुजी बाबा: म्हणजे माझे लोक पक्के हलकट लोकांच्या संगतीला लागलेत म्हण कि..!

मी: आम्हाला मार खावू घालता कि काय..!

लहुजी बाबा: जे वाईट ते वाईटच. वाईटाला वाईट म्हणणार नाहीत तर तुम्ही कसले सुधारक..! आम्ही चुकून 

जिवंत राहिलेलो आहोत. आमच्या विरोधात तर आख्खं पुणं होतं, तरी कुणाच्या बापाला घाबरलो नाहीत.

मी: बाबा, बाहेरच्यां पेक्षा घरच्यांसोबत लढणे आवघड असतं.

लहुजी बाबा: सत्य पेरताना घरचा बाहेरचा भेद करायचा नसतो.

मी: नक्कीच बाबा...तुम्ही आणि जोतीरावांनी निर्माण केलेल्या पाऊलवाटांनं जाणार आहोत. भलेही ती वाट 

कितीही काटेरी,दगडधोंड्यांनी गच्च भरलेली का असेना..!

लहुजी बाबा: अंधार पेरणाऱ्यांची चिंता करु नका, अंधार कधी उगवत नसतो. उगवतो केवळ प्रकाश. तुम्ही 

सुर्यपुत्र आहात, सुर्याशी नातं जपा....

मोबाईल टुंटुं..टुंटुं...करु लागला समोरुन आवाज येत नव्हता.

मी: बाबा...बाबा...हेलो...हेलो...बाबा...! मला वाटतं बाबांनी मोबाईल बंद केला वाटतं.

(टिप: दोस्तांनो, जो व्यवस्थेला घाबरत नाही, लिहायला बोलायला घाबरत नाही त्याला असे फोन येतात इतकं

ध्यानात असू द्या. क्रांतीवीर लहुजी साळवे बाबांना अंतिम दिनानिमित्ताने विनम्र अभिवादन..!)

कॉ. गणपत भिसे - अध्यक्ष - लाल सेना - ९८९०९४६५८२

No comments:

Post a Comment