मला जेव्हा ६ डिसेंबर अशी तारीख असते हे देखील माहिती नव्हतं ... बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे हे
देखील माहिती नव्हतं ... आणि तो दिवस ६ डिसेंबर ऐवजी "साडी सेंबर" या नावाने साजरा करतात असे
दुधखुळे ते वय असल्यापासूनच माझे आई-वडील मला चैत्यभूमी ला घेऊन जायला लागले. राहायला तेव्हा
घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये होतो. ५ तारखेला आम्ही जवळपास ११ - १२ वाजता घर सोडायचो. रात्रीची ट्रेन
देखील भरलेली असायची. झोप तर कधी त्या रात्री डोळ्यावर नसायचीच आणि रात्री दादर - प्रभादेवीच्या
रस्त्यावर लांब रांगेमध्ये जाऊन उभे राहायचो. आयुष्यात ती एकमेव लांब रांग असायची जिचा कधीच कंटाळा
आला नाही आणि नंबर लवकर यावा अशी हाव देखील वाटली नाही. ना कधी पाय दुखले त्या तासनतास उभे
असलेल्या रांगेत ना कधी भुकेने जीव कासावीस झाला. पहाटे चार - पाच वाजता चैत्यभूमीच्या आतमध्ये
पोहचायचो आणि समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या गेटने बाहेर पडायचो. तसेच आम्ही समुद्र किनाऱ्यावरून
शिवाजी पार्क कडे जाऊन भव्य दिव्य उभारलेले ते स्टेज पाहायचो ... पार्कवरच चांगली जागा बघून बांधून
आणलेली चपाती आणि बटाट्याची पिवळी भाजीचा नाश्ता करायचो. नाश्ता झाला की पुस्तकांचे तसेच भीम
बुद्धांच्या गाण्यांचे स्टॉल उभे असायचे त्यांना भेटी देऊन आवडती पुस्तके आणि गाण्यांची कॅसेट घ्यायचो. त्या
सर्व वातावरणात रात्रभर उभे राहिल्याने ना कधी थकवा जाणवला, ना कधी त्या आवाजांचा कंटाळा आला.
ती रात्र देखील दिवसाच्या लख्ख प्रकाशासारखी जागी असायची... प्रकाशमय असायची. ती म्हणजे त्या रात्री
सर्वत्र उभे असणाऱ्या स्टॉल्स ने... त्या रात्री रस्त्याच्या दुतर्फा बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या असलेल्या प्रतिमांनी
आणि मुर्त्यांनी ... आणि त्या रात्री वाजत असलेल्या भीम-बुद्धांच्या गाण्यांनी. आईच्या पोटात असल्यापासूनच
सर्वात प्रथम कानावर बाबासाहेब ऐकू आला असेल तर तो म्हणजे भीम-बुद्धांची गाणी गाणाऱ्या गायकांमुळेच.
त्या गायकांचे ऋण फेडू तेवढे कमीच. आणि त्या रात्री देखील भीम - बुद्धांच्या गीतांनी माझा बाबासाहेब जिवंत
वाटायचा मला. मला अभिमानाने जगण्याची स्फूर्ती द्यायचा. बाबासाहेब किती मोठी व्यक्ती होती आणि त्यांची
कीर्ती किती मोठी आहे हे मला त्या रात्री मुळे तेथे जमा होणाऱ्या जनसागरामुळेच कळालं.
माझ्या आई-वडिलांनी कधीच मला सांगितलं नाही की हा दिवस दुःखाचा दिवस आहे म्हणून आणि तो आपण
गांभीर्याने पाळला पाहिजे. कदाचित माझ्या ४ थी व ९ वी पूर्ण न केलेल्या आई-वडिलांना देखील बुद्धाचे तत्वज्ञान
अवगत असावे. दुःखात डुबून राहायला न शिकवता त्या दिवसाचा उपयोग माझ्या आई वडिलांनी बाबासाहेबांचे
विचार किती प्रगल्भ आहेत याची जाणीव करण्यासाठी केला असावा असे मला वाटते.
बुद्धाने सांगितल्याप्रमाणे या सृष्टीत सर्व काही नश्वर आहे तसेच दुःख देखील नश्वर आहे याची जाण आपल्या
बुद्धाने सांगितल्याप्रमाणे या सृष्टीत सर्व काही नश्वर आहे तसेच दुःख देखील नश्वर आहे याची जाण आपल्या
सर्वांना असणे गरजेचे आहे. याचे संस्कार माझ्या मनावर रुजत गेले जेव्हा माझे आजोबा वारले तेव्हा त्यांच्या
जलदान (?) विधी च्या कार्यक्रमाला रात्री एक सिनेमा दाखवला. याचं कारण काय तर ते दुःख विसरण्यासाठी.
काही तथाकथित आपल्याला आंबेडकरवादी म्हणणारे ६ डिसेंबर कसा साजरा करावा याचे बाळकडू इतरांना
पाजत आहेत. तर... "या दिवसाचं गांभीर्य आपण समजलं पाहिजे... हा दुःखाचा दिवस आहे .. आणि या दिवशी
दुखवटा पाळला पाहिजे" असं सांगत फिरत आहेत आणि काही जरा खूपच शिकलेल्यांनी सोफिस्टिकेटेड
आंबेडकरवाद्यांनी तर फेसबुक सारख्या सोशल मीडिया वरती ऑनलाईन मोहीमच चालवली आहे
“No Noise on 6th December”
माझ्या मनाला एक मूलभूत प्रश्न पडतो तो म्हणजे, कशासाठी दुखवटा? माझ्या कमी शिकलेल्या आई - वडिलांनी
मला ५ डिसेंबर च्या रात्री हातात हात घेऊन घराबाहेर नेलं ते दुखवटा पाळायला नव्हे तर बाबासाहेब कोण आहे
हे दाखवायला... बाबासाहेबांनी त्यांचं जीवन कसं घालवलं हे दाखवायला... बाबासाहेबांनी किती काबाड कष्ट
केले आणि इथल्या दबलेल्या समाजाला कसं बाहेर काढलं हे दाखवायला... बाबासाहेबांचा बुद्ध कसा आहे तो
दाखवायला... बाबासाहेबांनी रडणारा समाज नाही तर शिक्षणासाठी, इथली जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी
लढणारा समाज तयार केलाय हे दाखवायला...मला जर रडत बसायला बाहेर काढलं असतं तर कदाचित मला
बाबासाहेबांची ख्याती काय आहे ते कधीच कळली नसती. हा दिवस माझ्यासाठी दुःखात घालवण्यासाठी नाही
तर बाबासाहेबांचं पूर्ण जीवनकार्य आठवून हा दिवस साजरा करण्यासाठी आहे आणि बाबासाहेबांचं जीवन हे
दुःखात रडत बसून घालवण्यासारखं नसून ते आनंदात आणि जोशात साजरा करण्यासारखं आहे.
मी आजही या दिवशी चैत्यभूमीला जातो तो माझा समाज दुःखात बुडालेला बघिण्यासाठी नव्हे तर त्याच
समाजाकडून चैतन्यमय वातावरण निर्माण करायला…मी आजही या दिवशी जातो ती बाबासाहेबांच्या विचारांची
प्रेरणा जागृत ठेवायला... मी आजही या दिवशी जातो ती अन्यायाविरोधात लढण्याची स्फूर्ती निर्माण करायला...
मी आजही या दिवशी जातो ती विचारांची देवाण घेवाण करायला.
ज्या गाण्यांचा माझ्या कमी शिकलेल्या आई वडिलांना आणि त्याबरोबरच आता पर्यंत चैत्यभूमीला भेट दिलेल्या
लाखो न शिकलेल्या भीम अनुयायांना कधीच त्रास झाला नाही. याचे एकमेव कारण म्हणजेते कधीच दुसऱ्यांना
शिकवायला चैत्यभूमीला आले नाही कारण त्यांच्या डोक्यात - ओठात आणि पोटात फक्त आणि फक्त
बाबासाहेब होता.
म्हणून माझी आता जरा खूपच शिकलेल्या माझ्या सोफिस्टिकेटेड बहीण - भावंडांना एकच विनंती आहे की ‘No
म्हणून माझी आता जरा खूपच शिकलेल्या माझ्या सोफिस्टिकेटेड बहीण - भावंडांना एकच विनंती आहे की ‘No
Voice' सारख्या मोहीम राबविण्यापेक्षा आपल्या युवकांसमोर खूप महत्वाचे प्रश्न उभे आहेत. आपण आपली
ऊर्जा
- आपली ताकत अश्या समस्या सोडविण्यासाठी जर खर्च केलीत तर ती वायाही जाणार नाही आणि
बाबासाहेबांनी पाहिलेलं, आपला सर्व समाज शिक्षित होण्याचं स्वप्न... तसेच इथली जात व्यवस्था नष्ट करण्याचं
स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. ती ऊर्जा ती ताकत बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होण्यास उपयोगात आणावी हीच
विनंती.
लेखक : समीर मोहिते ( 09869653835 )